Breaking News

देवेंद्र फडणवीस यांची टीका, काँग्रेस नेते निवडणूक काळात मंदिरात, आणि संपली की…

निवडणूक आली की काँग्रेस नेते मंदिरात जातात आणि निवडणूक संपली की बँकॉकमध्ये जातात. हेच नेते राम आणि रामसेतू दोन्हीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत, अशी परखड टीका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मध्य प्रदेशात केली.

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा आज थंडावल्या. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सौंसर आणि पांढुर्णा येथे सभा घेतल्या. सौंसर आणि पांढुर्णा या विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अनुक्रमे नानाभाऊ मोहोड आणि प्रकाश उईके यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांनी आज सभा घेतल्या. मध्य प्रदेशचा हा तिसरा प्रचार दौरा होता, यापूर्वी त्यांनी १८ सप्टेंबर आणि १० नोव्हेंबर रोजी प्रचारात भाग घेतला होता. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, माजी मंत्री परिणय फुके, आ. प्रवीण दटके यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही तीच मंडळी आहेत, जे सनातनला डेंग्यू, मलेरिया म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच्या अंधारात तोडणारे हेच कमलनाथ आहेत. कमलनाथ हे देशाच्या बाजूने आहेत की औरंगजेबाच्या बाजूने हा प्रश्न निर्माण होतो. शिवरायांचा पुतळा पाडणारे कधीच पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी त्याच ठिकाणी शिवरायांचा पुतळा उभा केला, असे सांगितले.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1724761042121830680

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज जनजाती गौरव दिवसानिमित्त पंतप्रधानांनी २४,००० कोटींची पीएम जनमन योजना प्रारंभ केली आहे. यापूर्वी ११,००० कोटींची विश्वकर्मा योजना प्रारंभ केली. शेवटच्या घटकाचा विचार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळेच आजवरचा सर्वांत मोठा गरिब कल्याणाचा अजेंडा त्यांनी राबविला.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मोदीजी शेतकरी सन्मान निधीची मदत देतात. पण, जेथे भाजपाची सरकारे नाहीत, तेथील राज्य सरकारे मोदीजींच्या योजनांची अंमलबजावणी होऊ देत नाही. त्यामुळे देशाच्या विकासात मध्य प्रदेश कुठे असेल हे ठरविणारी ही निवडणूक आहे. पांढुर्णा हा नवीन जिल्हा झाल्याने आता पांढुर्ण्याचे अनुदान पांढुर्ण्याला मिळेल, असेही सांगितले.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *