Breaking News

उमेदवारांच्या खर्चावर असणार खर्च संनियंत्रण कक्षाची नजर

लोकसभा निवडणुकीत संबंधित उमेदवार अथवा राजकीय पक्ष करीत असलेल्या खर्चावर जिल्हास्तरीय खर्च सनियंत्रण कक्षाची नजर असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकाऱ्यांची खर्च सनियंत्रण विषयक बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ व सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. मुंबई उपनगर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक खर्च निरीक्षक दाखल झाले असून ते मतदारसंघनिहाय खर्चविषयक कामकाजाचा आढावा घेत आहेत.

प्रत्येक खर्चाचा तपशील खर्च सनियंत्रण कक्षाला कळविणे बंधनकारक

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी क्षीरसागर म्हणाले की, उमेदवारांच्या आणि राजकीय पक्षांच्या प्रत्येक खर्चावर करडी नजर ठेवण्यात यावी. प्रत्येक खर्चाचा तपशील खर्च सनियंत्रण कक्षाला कळविणे बंधनकारक आहे. उमेदवाराने आपल्या खर्चाचे दैनंदिन लेखे विहित नमुन्यात ठेवणे, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी कोणतीही सभा अथवा पदयात्रेची परवानगी मागताना संभाव्य खर्चाचा आराखडा सादर करणे आवश्यक राहणार असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.

खर्चाबाबतचे सादर करण्याचे नमुने प्राप्त करुन घेण्याचे आवाहन

प्रचार साहित्यावर फक्त विशिष्ट पक्षाचे चिन्ह असेल तर असा खर्च त्या संबंधित पक्षाच्या खर्चामध्ये समाविष्ट केला जाईल. परंतु जर प्रचार साहित्यावर उमेदवाराचा फोटो, नाव असेल तर तो खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जाईल. उमेदवाराचे स्वत:चे मालकीचे वाहन असेल तर अशा वाहनाचा फक्त इंधन व चालकाचा खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जाईल. मात्र, उमेदवारांच्या इतर वाहनांचा खर्च त्यावर घोषित केलेल्या दराप्रमाणे उमेदवारांना द्यावा लागणार आहे. त्याची नोंद त्यांना खर्च संनियंत्रण कक्षाकडे द्यावी लागणार आहे. उमेदवारांने त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीचे सर्व तपशील जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळविणे आवश्यक असून निवडणुकीचा खर्च निकालाच्या दिवसापर्यंत गणला जाईल.

बैठकीत निवडणूक खर्चासंदर्भात घ्यावयाची खबरदारी याबद्दलची माहिती देण्यात आली. उमेदवारांनी त्यांना दाखल करावयाच्या खर्चाबाबतचे सादर करण्याचे नमुने प्राप्त करुन घ्यावेत. कोणत्याही प्रकारे याबाबतच्या अज्ञानाची सबब चालू शकणार नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

Check Also

मुंबई उच्च न्यायालयाचे संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या औरंगाबाद शहर आणि महसूल क्षेत्राचे अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *