Breaking News

आशिष शेलार यांची टीका, उद्धव ठाकरे वोट जिहादचे आका

इंडी आघाडीकडून एक नवीन पद्धतीचा जिहाद सुरू झाला आहे. पूर्वी आपण लँड जिहाद पाहिला, लव जिहाद, भाषा जिहाद बघितला आता वोट जिहाद मुंबईत मोठ्याप्रमाणात सुरू झाला आहे. या वोट जिहादचा प्रमुख आका कोण असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत अशी घणाघाती टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केली.

अश्या देशविरोधी शक्तीच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसत आहेत म्हणून प्रत्येक राष्ट्रभक्ताचं मत हिरवी चादर पांघरणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात पडले पाहिजे असेही आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी केले.

दक्षिण मुंबईच्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ परेलच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते आज बोलत होते. महायुतीच्या महाविजयासाठी एकजुटीने काम करण्याचे तसेच मोदी सरकारने केलेली विकासाची कामे घेऊन लोकांमध्ये जाऊन दमदार प्रचार करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी कॅबिनेट मंत्री ॲड.मंगलप्रभात लोढा, महामंत्री संजय उपाध्याय, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, आम्ही कुठल्या धर्माच्या भाषेच्या विरोधात नाही. १९५० ते २०१४ पर्यंत बहुतांश काँग्रेस राजवटीच्या कार्यकाळात जेव्हा मुस्लिमांची लोकसंख्या पाच टक्क्यांनी वाढते तेव्हा हिंदुंची संख्या ७.८ टक्क्यांनी कमी होते. यासाठी वोट जिहादच्या विरोधात लढताना आपल्याला आपले राष्ट्र टिकवायचे आहे. आपला हिंदुस्तान ताठ मानेने उभा करायचा आहे. हिंदू एकत्र आला तर यांना त्रास होतो त्यामुळे हिंदू विरोधी सर्वजण एकत्र आले आहेत. गेले दोन ते तीन दिवस मराठी आणि गुजराती वाद पेटविण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. मराठी आणि गुजराती बांधव दुधात साखर याप्रमाणे मुंबईत राहत आहेत. मराठी भाषा आणि मराठी माणसाचा अपमान भाजप होवू देणार नाही आणि गुजराती माणसांवर अन्यायही चालू देणार नाही असेही मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यावेळी म्हणाले.

त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे..

उबाठा गटाला खूप माज आला आहे, मस्ती चढली आहे. अहंकार आला आहे. हा माज स्वत:च्या जीवावर असता तर ठीक होते पण तोही नाही. उद्धव ठाकरे यांचं प्रत्येक भाषण मी पाहतो. विरोधक काय करतात ते पाहिलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांना कुणीही विचारत, कुणाच्या मनात प्रश्नही नाही तरीही ते सारखं म्हणतात मी, मर्दांचा पक्ष आहे. आमच्या मनात त्यांच्याबद्दल काही शंका नाही. स्वतःच्या मर्दुमकिवर अरविंद सावंत यांनी माज, मस्ती अहंकार केला तर समजू शकतो. ते इतके घाबरले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यांच्या समर्थकाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात लिहिलं ज्या मशीनवर तुम्हाला कमळ दिसणार आहे तिकडे तुम्हाला मशाल बटन दाबायचे आहे. अशा प्रकारचा अपप्रचार केला जात आहे. उबाठा गटाला कोणी मत द्यायला तयार नाही म्हणून ही खोटं पसरवत आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेली युती पक्की राहील. जिकडे कमळ आहे तिकडे धनुष्यबाण राहील. त्यामुळे धनुष्यबाण हे निशाणी असणारे बटन आपल्याला दाबायचे आहे असेही मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले.

एका विशिष्ट वर्गाच्या मतासाठी उद्धव ठाकरे यांचा कुर्निसात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात आपल्याला एक आव्हान केले आहे त्यावर करताना आपल्याला सजग राहायला सांगितले आहे. डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायला सांगितले आहे. गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांनी माहीमच्या काही लोकांना शिवसेना भवनात बोलावलं. एका विशिष्ट रंगाच्या लोकांना बोलावून हिरवी चादर घालून त्यांना बसवलं आणि उद्धव ठाकरे त्यांना म्हणाले, हो गया, झालं गेलं विसरून जा…विसरून जा म्हणजे काय? त्या माहीममध्ये याकूब मेमनने त्याच्या स्कूटरमध्ये भरलेला आरडीएक्स मुंबईतील बारा ठिकाणी ठेवून बॉम्बस्फोट करून मुंबईकरांचा बळी घेतला. त्या याकूब मेमनच दहशतवादी कृत्य उद्धव ठाकरे हिंदूंना आणि मराठी माणसाला विसरायला लावत आहेत. विसरा म्हणून सांगत आहेत हा वोट जिहाद आहे. ॲड. उज्ज्वल निकम यांनी कसाबच्या विरोधातील लढाई लढली. २६/११ दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी गेलेल्या हुतात्म्यांचा अपमान करण्याचे काम उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले काँग्रेस करत आहे. काँग्रेसचे वडेट्टीवार सांगतात, कसाबने गोळीबार केलाच नाही. कसाबने मुंबईवर हल्ला केला नाही. कसाबने १६७ निष्पाप मुंबईकरांचे प्राण घेतले नाहीत. कसाबच्या गोळीने आमचे वीर अधिकारी मारले गेले नाहीत. एका विशिष्ट वर्गाच्या मतासाठी उद्धव ठाकरे कुर्निसात करत आहेत. हा वोट जिहाद मुंबईत पसरवण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत. उबाठाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना मते मिळविण्यासाठी १९९३ च्या दंगलीतील आरोपी इकबाल मुसा याची मदत घेतली आहे. ज्याला दहा वर्षे शिक्षा झाली होती त्याच्या मदतीवर उद्धव ठाकरे मते मागत आहेत अशीही टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केली.

Check Also

१०४ वर्षांच्या आज्जींनी बजावला गृह मतदानाचा हक्क

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाचा पर्याय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *