Breaking News

मुंबई शिक्षक मतदार संघाची निवडणूक तारीख पुढे ढकलण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

भारत निर्वाचन आयोगाने ८ मे रोजी प्रेस नोट जारी करत मुंबई शिक्षक मतदार संघासह राज्यातील शिक्षक, पदवीधर मतदार संघांच्या निवणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार या मतदारसंघांसाठी १० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. मात्र शाळा १५ जून नंतर सुरू होणार असल्यामुळे सुट्ट्यांवर गेलेल्या शिक्षक मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी दिल्लीत आज भारत निर्वाचन आयोगाला निवेदन दिले. सुट्ट्यांमुळे मतदार मतदानापासून वंचित राहू शकतात यासंबंधीची वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुका घेण्याची विनंती केली.

दिल्लीतून महाराष्ट्रात आलेल्या निर्वाचन आयोगाच्या निरीक्षकांना शिक्षक भारतीचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी मंत्रालयात आज भेट घेऊन निवेदन दिले. १० जूनला निवडणुका घेतल्यास मतदानावर कसा विपरीत परिणाम होऊ शकतो याबद्दलची वस्तुस्थिती त्यांच्याही निदर्शनास आणून दिली.

मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची शिफारस …

मतदानाच्या तारखेबद्दल गोंधळ होऊ शकतो हे गृहीत धरून कपिल पाटील यांनी निर्वाचन आयोगाचे राज्यातील प्रमुख असलेले मुख्य निवडणूक अधिकारी यांना याबाबत फेब्रुवारीत निवेदन दिले होते. मतदानाची तारीख शाळा सुरू झाल्यानंतर घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यात मतदान घेण्याबाबत त्यांनीही भारत निर्वाचन आयोगाकडे १३ एप्रिल रोजी शिफरस केली होती.

निवडणूक दहाला पण मतदार गावाला …

भारत निर्वाचन आयोगाने जारी केलेल्या कार्यक्रमानुसार मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक आणि मुंबई शिक्षक या चार मतदारसंघांसाठी १० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत आणि शिक्षक एकतर त्यांच्या मूळ गावी गेले आहेत किंवा त्यांच्या कुटुंबासह सुट्टीवर आहेत. या काळात बहुतेक लोक त्यांच्या मूळ गावी किंवा सुट्टीवर जातात, कारण मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात. १५ जून आणि १८ जून रोजी शाळा पुन्हा सुरू होत आहेत आणि त्यामुळे शिक्षक आणि पदवीधर १० जून २०२४ रोजी मतदान करण्यासाठी त्यापूर्वी परत येतील अशी अपेक्षा करणे केवळ अशक्य आहे. याव्यतिरिक्त, असे बहुतेक प्रवासी त्यांचे परतीचे तिकीट देखील बुक असतात आणि त्यांना अल्पावधीत नवीन आरक्षण/तिकीट मिळणे अशक्य आहे.

उत्तर भारतीय शिक्षकही ११ जून नंतर येणार …

मुंबईतील शिक्षक/पदवीधर मतदारसंघात उत्तर भारतीय मतदारही मोठ्या संख्येने आहेत. ते टीचर्स स्पेशल ट्रेनने परततील, जी १० जून २०२४ रोजी गोरखपूरहून निघेल आणि ११ जून २०२४ रोजी मुंबईत पोहोचेल.

२०१८ मध्येही अशी परिस्थिती निर्माण झाली होती …

मागील २०१८ च्या निवडणुकीतही अशीच अनिश्चितता होती. मतदानाची तारीख ८ जून २०१८ ही जाहीर केली गेली होती, परंतु आमदार कपिल पाटील यांनी तथ्यांसह भारत निर्वाचन आयोगाकडे रदबदली केल्यानंतर, तारीख बदलून २५ जून २०१८ करण्यात आली. विधान परिषदेच्या वरील चारही सदस्यांचा कार्यकाळ ७ जुलै २०२४ रोजी संपत आहे.

शिवाय, १० जूनला निवडणूक घेणे हे निर्वाचन आयोगाच्या “नो व्होटर टू बी लेफ्ट बिहाइंड” या तत्वाशी विसंगत ठरेल, असे कपिल पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

शिक्षक भारतीचे कोकण आयुक्त यांना निवेदन …
याच संदर्भात कोकण आयुक्त यांनीही आज बैठक बोलवली होती. तिथेही शिक्षक भारतीचे प्रतिनिधी पी पी पाटील यांनी निवेदन देऊन मतदानाच्या तारखेत बदल करण्याची मागणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी २० मे रोजी मुंबईत मतदान होणार आहे. त्यामुळे इलेक्शन ड्यूटी आणि मतदानाचा हक्क बजावून उशिरा गावी जाणाऱ्या शिक्षक मतदार, त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शाळा १५ जूनला सुरू होत असताना १० जूनला शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मुंबईत येणे जिकरीचे झाले आहे. या सर्व घडामोडीनंतर मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक तारखेमध्ये बदल झाला तर कुटुंबासमवेत सुट्टीवर गेलेल्या शिक्षक मतदारांना मोठा दिलासा मिळेल तसेच सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल, असे सुभाष मोरे यांनी सांगितले आहे.

Check Also

१०४ वर्षांच्या आज्जींनी बजावला गृह मतदानाचा हक्क

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाचा पर्याय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *