Breaking News

पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, २५ वर्षात एका पैशाच्या घोटाळ्याचाही आरोप नाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही भ्रष्टाचार हटविण्याचा संकल्प करतो, तेव्हा इंडी आघाडीचे लोक भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी मोर्चे काढतात. येत्या पाच वर्षात अशा सर्व भ्रष्ट लोकांवर वेगाने कडक कारवाई केली जाईल, आणि भ्रष्टाचार खणून काढला जाईल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी झारखंडमधील पलामू आणि लोहरदगा येथे आयोजित केलेल्या विशाल जाहीर विजय संकल्प सभांमध्ये बोलताना दिली.

झारखंडमधील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहिर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी, झारखंडचे विरोधी पक्षनेते व ज्येष्ठ नेते अमर कुमार बाउरी यांच्यासह अन्य उमेदवार उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हणाले की, इंडी आघाडीचे नेते जनहित आणि विकासाच्या मागणीसाठी नव्हे तर भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी रॅली काढतात. काँग्रेसने गेल्या ६० वर्षांत केवळ घराणेशाही, भ्रष्टाचार आणि मतांचे तुष्टीकरण केले आहे. काँग्रेसच्या डावपेचांनी देशाला नक्षलवाद आणि माओवादाच्या रक्तरंजित हिंसेचा तडाखा दिला, पण आम्ही सत्तेवर आल्यानंतर देशाचा मोठा भाग माओवाद्यांच्या हिंसेतून मुक्त केला. आपली मते वाचवण्यासाठी काँग्रेस दहशतवाद्यांवर कारवाईही करत नाही, असा आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, घुसखोरांना प्रोत्साहन देण्याचा आणि आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचा घातक खेळ झारखंडमध्ये सुरू आहे. पीएफआयसारख्या बंदी घातलेल्या संघटना संथालमध्ये त्यांचे रॅकेट चालवत आहेत आणि आदिवासी महिलांवर अत्याचार करत आहेत. जेव्हा लोक या विरोधात आवाज उठवतात, तेव्हा इंडी आघाडी व्होट जिहादचे आवाहन करू लागते. काँग्रेसने कितीही जिहाद केले तरी हा देश मागे हटणार नाही, झामुमो-काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अमाप संपत्ती गोळा केली आहे. मालमत्ता असो, राजकारण असो, ते आपल्या मुलांसाठी सर्व काही कमवत असतात. त्यांचा वारसा म्हणून ते बराच काळा पैसा मागे ठेऊन जातील, असा गंभीर असेही यावेळी सांगितले.

काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आज पाकिस्तानचे नेते काँग्रेसच्या राजपुत्राला पंतप्रधान बनवण्याची प्रार्थना करत आहेत, पण सशक्त भारताला आता मजबूत सरकार हवे आहे आणि मजबूत सरकारसाठी मोदी सरकार हवे, ही देशाच्या जनतेची भावना आहे. जनतेच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून देशवासियांची सेवा करत असून गेल्या २५ वर्षांत माझ्यावर एका पैशाच्या घोटाळ्याचाही आरोप झालेला नाही. आजही मी पद, प्रतिष्ठा, सुख-समृद्धी यापासून दूर आहे, आणि हीच माझी ताकद आहे, असा दावाही यावेळी केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवण्यास इंडी आघाडीने कडाडून विरोध केला होता. काँग्रेसच्या काळात रेशन सडत राहिले. आदिवासी भागातील मुले उपाशी मरत राहिली आणि काँग्रेसने धान्य गोदामांना टाळे ठोकले. आम्ही सर्व धान्य गोदामांचे कुलूप उघडले, आज देशात मोफत रेशनची योजना सुरू आहे. पुढील पाच वर्षे ही योजना चालू राहील याची मी हमी दिली आहे. झारखंडमध्ये रोज पेपरफुटीच्या घटना घडत असत आणि तरुणांच्या भवितव्याशी खेळले जायचे, पण आज केंद्रातील भाजपा सरकारने पेपरफुटी विरोधात कडक कायदा केला असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील जनतेला कधीही संकटांनी भरलेले जीवन जगावे लागू नये यासाठी मी विकसित भारताचा वारसा देणार आहे, मी गरिबीत जगलो आहे आणि गरिबांच्या अडचणीतून गेलो आहे. म्हणूनच माझ्या १० वर्षांच्या गरीब कल्याण योजना माझ्या जीवनातील अनुभवातून जन्माला आल्या आहेत. आज लाभार्थींना भेटल्यावर माझ्या डोळ्यात अश्रू तरळले असून या अश्रूंची किंमत फक्त गरिबीत जगलेली व्यक्तीच समजू शकते. ज्याने आपल्या आईला पोट बांधून झोपताना आणि शौचालया अभावी वेदना आणि अपमान सहन करताना पाहिले नाही, त्याला मोदींच्या या अश्रूंचा अर्थ समजू शकत नाही, पण काँग्रेसच्या राजपुत्रांना मोदींच्या अश्रूंमध्ये आपला आनंद दिसतोय आणि हे निराश आणि हताश झालेले लोक इतके उदास झाले आहेत की त्यांना मोदींचे अश्रू आवडू लागले आहेत. “जाके पाँव फटे न फटे बिवाई, सो क्या जाने पीर पराई” अशी काव्यत्मक टीकाही यावेळी केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *