Breaking News

प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन, घराणेशाही संपवण्याचा एकदा निर्णय घ्या

तरुणांच्या हाताला काम पाहिजे का ? विभागाचा विकास झाला पाहिजे का ? हे तुम्ही एकदा ठरवा. यासाठी तुमच्याकडे मोठे हत्यार आहे ते म्हणजे ही घराणेशाही संपवा आणि कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा लावा. घराणेशाही संपली की, पक्षातला कार्यकर्ता मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याला विश्वास संपादन करायचा असतो. त्यासाठी त्याला लोकांशी जुळवून घ्यायचे असते. त्यासाठी जनतेच्या प्रश्नासाठी लढावं लागतं, आवाज उठवावा लागतो असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अहमदनगर येथील सभेत केले.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते.

आमच्या नावाने खडे फोडले जातात, पण मतदार आमच्या बाजूने आहे. तो आम्हाला निवडून देणार याच्याबद्दल मनात शंका नसल्याचेही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जो मराठा समाज जरांगे पाटील यांच्यासोबत आहे, त्यांना यांनी उमेदवारी दिली नाही. श्रीमंत आणि घराणेशाहीतील, नात्यागोत्यात मराठा समाजाला उमेदवारी दिली आहे. आज घराणेशाहीत सत्ता आहे, याच्याशी तुमचा काय संबंध आहे. तुमचा संबंध फक्त मतदानादिवशी मतदान द्या, डाव्या किंवा उजव्या हाताला सत्ता द्या. मग ते म्हणतात याचं काय देणं घेणं आहे, पाच वर्षानंतर बघू असेही यावेळी बोलताना सांगितले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी रावेरमध्ये प्रचाराला होतो तिथे काही लोक म्हणाले एक हजाराला एक मत आहे. मी म्हणालो, तुम्ही नालायक आहात. तुम्ही तुमचं मत विकत द्यायला जात नाहीत, तुमचं मत तो विकत घ्यायला येतो. तो किंमत करतो. तुम्ही तुमच्या मताची किंमत करा आणि त्याला म्हणा की, एक लाखाला एक मत आहे देतो का? तुमच्यात एवढी ताकद नाही का ? माझं मत मी एक लाखाला विकतो एवढी सांगायची? ज्यावर तुमचा अधिकार आहे, त्यावर सुद्धा अधिकार तुम्हाला सांगता येत नसेल तर गुलामीची परिस्थिती तुम्ही स्वतःच निर्माण करत असल्याची खोचक टीकाही यावेळी उपस्थितांवर केली.

शेवटी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, गोतावळ्याच्या राजकारणातून नगर जिल्ह्याला बाहेर काढा. तरच नगर जिल्ह्याचा विकास होईल नाहीतर अजिबात विकास होणार नसल्याचा इशाराही यावेळी दिला.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *