Breaking News

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी पार पडत आहे. त्यामुळे राज्यातील विविध पक्षांकडून आपलाच उमेदवार निवडूण यावा यासाठी भाजपा आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरु आहे. मात्र भाजपाला यंदाची निवडणूक पूर्वीप्रमाणे सहज सोपी नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने प्रचाराच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यातच २९ आणि ३० एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी यांच्या ६ सभा पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर या मतदारसंघात पार पडल्या. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता पंतप्रधान राहिले नाहीत. तर ते आता आठवडा मंत्री झालेले आहेत. दर आठवड्याला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत असा टोलाही लगावला.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, मध्यंतरी काहीजण म्हणाले की, माढ्याचे उमेदवार आहेत ते वयाने लहान आहेत त्यांच्या ठिकाणी काही ज्येष्ठ व्यक्ती असायला हवा होता. पण मी त्यांना सांगतो की, मी वयाच्या २६ वर्षी निवडणूकीला उभे राहुन विधानसभेत गेलो. वयाच्या २९ वर्षी मी मंत्री झाला. तर वयाच्या ३६ व्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. त्यामुळे ज्याला लोकांसाठी काम करायचे आहे, तशी कोणाची जिद्द असेल आणि तसे करण्याची कर्तृत्व असेल तर त्या व्यक्तीला वय आडवे येत नसल्याचे सांगत माढ्याच्या उमेदवाराच्या मागे तर राजकिय पार्श्वभूमी आहे असे सांगत टीकाकारांची तोंडे बंद करण्याचा प्रयत्न केला.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, मी सुरुवातीच्या काळात अकलूजला नेहमी येत असे. त्यावेळी शंकरराव मोहिते पाटील होते. त्यांच्यासोबत माझे मोठे बंधू आप्पासाहेब पवार हे शंकररावांबरोबर काम करत असत, या दोघांनाही सतत या भागाच्या विकासाची काळजी असायची. त्यावेळी या भागात दुष्काळी परिस्थिती आणि कारखान्यांची चिंता असायची, असेही सांगितले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, पूर्वी आम्ही कधी तरी ऐकायचो की पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची कधी तरी सोलापूरात सभा आहे म्हणून. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात, त्यामुळे त्यांचे येणे कधी तरीच व्हायचे. मात्र आताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोलापूर, पुणे, माळशिरस याची माहिती तरी कळली. त्यामुळे नरेंद्र मोदी हे दर आठवड्याला इकडे येत आहेत. यामुळे ते पंतप्रधान नाही तर आठवडा मंत्री झाल्याची टीकाही यावेळी केली.

शेवटी बोलताना शरद पवार म्हणाले की, आता आमची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकच विनंती आहे की, यापुढे या भागात येताना हेलिकॉप्टर आणि विमानाने येऊ नये, रस्त्याने यावे जेणेकरून या भागातील रस्ते तरी चांगले होतील असा खोचक टोला लगावत देशाच्या कोणत्याही राज्यात चांगला प्रकल्प आला की, नरेंद्र मोदी हे तो प्रकल्प गुजरातला घेऊन जातात. आतापर्यंत आमचा समज होता की पंतप्रधान हा कधी खोटे बोलत नसतात. परंतु नरेंद्र मोदी हे कुठेही गेले तरी राहुल गांधी यांच्यावर टीका करतात, राहुल गांधीनी तुमचे काय घोडे मारलेय असा सवालही यावेळी उपस्थित केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *