Breaking News

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देत उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र आज अखेर माजी आमदार नसीम खान यांनी आपली नाराजी दूर झाल्याचे सांगत पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात सक्रिय होत उमेदवार वर्षा गायकवाड या लहान बहिणीसारख्या असून त्यांच्या विजयासाठी प्रचार करणार असल्याची ग्वाही आज टिळक भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान म्हणाले की, अल्पसंख्याक समाज, उत्तर भारतीय समाजाची भावना मी अखिल भारतीय काँग्रेसला कळवली होती, माझ्या पत्राची पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी दखल घेतली. समाजाच्या वतीने मी काही मुद्दे मांडले होते, येणाऱ्या काळात त्यावर पक्ष योग्य तो निर्णय घेईल. मी पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता असून राहुल गांधी व मल्लिकार्जून खर्गे यांच्या लढाईत मजबूतपणे सहभागी होत इंडिया आघाडीचा पंतप्रधान व्हावा यासाठी काम करणार, असल्याचे स्पष्ट केले.

नसीम खान पुढे बोलताना म्हणाले की, आपली कोणतीही नाराजी नसून उत्तर मध्य मुंबई मतदार संघातील इंडिया आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड या दोन लाख मतांनी विजयी होतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या राजीनाम्यावर बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, नसीन खान यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहिले होते त्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यात आली. नसीम खान यांनी पुण्यात राहुल गांधी यांचीही भेट घेतली. काँग्रेसमध्ये विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, पक्षात लोकशाही आहे. काँग्रेस सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. नसीम खान व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेला राजीनामा परत घेतला असून ते प्रचारात सक्रीय होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, कोषाध्यक्ष डॉ. अमरजित मनहास, प्रदेश उपाध्यक्ष प्रशासन व संघटन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरे, सुनिल अहिरे, निजामुद्दीन राईन भरत सिंह आदी उपस्थित होते.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *