Breaking News

जयंत पाटील म्हणाले, समित्यांचा निकाल म्हणजे राज्यात त्यांचे सरकार… याचा अर्थ सहकारी क्षेत्रात सोसायटीत काम करणारे, कार्यकर्ते हे महाविकास आघाडीच्या बाजूने

महाविकास आघाडी एकसंघ राहिल्यामुळे महाराष्ट्रात भाजपाची ताकद किती कमी आहे हे पुन्हा एकदा बाजार समितींच्या निवडणूकीतून महाराष्ट्रासमोर आले आहे. आणि एकनाथ शिंदे हे चाळीस आमदार घेऊन गेले तरी त्यांना म्हणावे इतके यश मिळाले नाही याचा परिणाम हा भाजपा आणि एकनाथ शिंदे एकत्रित आले तरी महाराष्ट्रात त्यांचे सरकार येणार नाही हे चित्र तयार करणारे आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल प्रतिक्रिया दिली.
आज प्रदेश कार्यालयात आले असता जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या बाजार समित्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्या याचा अर्थ सहकारी क्षेत्रात सोसायटीत काम करणारे, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत त्यामुळे कितीही वल्गना भाजपा व एकनाथ शिंदे यांनी केल्या तरी त्यांचे फार मोठ्या प्रमाणावर सदस्य निवडून आले असते. पण तसे चित्र दिसले नाही त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांचेच प्राबल्य या बाजार समित्यांमध्ये दिसले. त्यातून महाविकास आघाडीच्या वज्रमूठीची ताकद किती आहे हे समोर आले आहे असेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना स्पष्ट केले.

सरकारने घोषणा नुसत्या केल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या, शेतमजूरांच्या,ग्रामीण भागातील लोकांच्या प्रश्नांविषयी गंभीर नाही. फक्त इव्हेंट करणे आणि मोठमोठे कार्यक्रम करणे व लाखोंच्या संख्येने लोक आणणे त्यात काही लोकांचा मृत्यू झाला तरी या सरकारला याची तमा नाही. अशी मानसिकता सरकारची आहे असा थेट हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.

सरकारने अवकाळी पावसात अडकलेल्यांना दिलासा दिला नाही. आता हवामान खात्याने उद्यापासून पाऊस हजेरी लावणार आहे. त्यासाठी राज्य सरकार सज्ज झालेले दिसत नाही. जो शेतकरी संकटात आहे त्याच्याच नशीबी अवकाळी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी सावरण्यासाठी सरकारने काही केलेच नाही. किमान पाऊस येणार हे माहीत असताना राज्यातील महसूल यंत्रणा, पोलीस, आरोग्य यंत्रणा सतर्क सरकारने ठेवली पाहिजे. त्यासाठी तातडीने बैठका घेतल्या पाहिजेत अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.

एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी अजित पवारांकडून पैसे मिळत नाहीत, सरकारमध्ये आमची कामे झाली नाहीत. राष्ट्रवादीला लाखोली वाहून भाजपसोबत गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून वेगळया अपेक्षा करणे योग्य वाटत नाही असेही जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले.

आघाडीमध्ये जास्त संख्या त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र साधारण असते. आम्ही आघाडीत असलो तरी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाचा असतो. त्या अनुषंगाने काही विधाने झालेली असतील. पण महाविकास आघाडी प्रयत्नांची शिकस्त करुन जास्तीत जास्त उमेदवार जिंकून आणण्याचा प्रयत्न आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्राची स्थापना एक मे रोजी झाली त्यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा मंगलकलश त्यांनी महाराष्ट्रात आणला. तो इतिहास आहे महाराष्ट्राचा आणि तो स्वाभिमानाने भरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्रात स्वाभिमान काय असतो हे मराठी जनतेने पाहिले आहे. त्या अनुषंगाने आज महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्रातील सर्वांनी आतापर्यंत स्वाभिमान दाखवला आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *