Breaking News

नाना पटोले यांचे आवाहन, भाजपा सरकारकडून राज्याची होत असलेली अधोगती थांबवूया कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या भाजपालाच आता घरी बसवा

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर देशात पहिल्या नंबरचे राज्य अशी महाराष्ट्राची ओळख निर्माण करण्यात काँग्रेस सरकारचेच मोठे योगदान आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत काँग्रेसच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी राज्याला प्रगतीपथावर आणून ठेवले. परंतु मागील काही वर्षांपासून दिल्लीच्या आदेशावरून भाजपा सरकार महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात आहे. ही अधोगती थांबवून पुन्हा एकदा महाराष्ट्राला देशात अव्वल स्थानी आणण्याचा संकल्प महाराष्ट्रदिनी करुयात, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक विभागाचे प्रभारी के. राजू, माजी मंत्री व आदिवासी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार, राजन भोसले, राजेश शर्मा, मुनाफ हकिम,सोशल मीडीयाचे राज्य प्रमुख विशाल मुत्तेमवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेस सरकारने महाराष्ट्रात गुंतवणूक वाढावी यासाठी पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण केले, कायदा सुव्यवस्था उत्तम राखली ज्यामुळे महाराष्ट्र देशात सधन व गुंतवणुकीसाठी पहिल्या पसंदीचे राज्य म्हणून उभे राहिले परंतु राज्यात सध्या गुंतवणुक येऊ दिली जात नाही. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला हलवले जात आहेत परिणामी राज्यातील बेरोजगारी वाढण्यात होत आहे. महाराष्ट्राची ही अधोगती रोखण्याचे काम आपल्याला करायचे आहे.

देशाच्या जडणघडणीत कामगारांचे मोठे योगदान आहे. कामगारांना त्यांचे न्याय व हक्क मिळाले पाहिजेत यासाठी काँग्रेस सरकारने कायदे केले पण भाजपा सरकारने ते कायदे बदलून भांडवलदारधार्जिणे कायदे बनवले आहेत. नव्या कामगार कायद्याने कामगारांना मालकांचे गुलाम बनवण्याचे काम केले आहे. कामगारांना उद्धवस्त करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. कामगारदिनी भाजपाला घरी बसवण्याचा संकल्प करा, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यावेळी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जनतेचा आशिर्वाद ज्या पक्षाला त्या पक्षाचा मुख्यमंत्री..

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरु असली तरी त्यावर आता भाष्य कण्याची गरज वाटत नाही. जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत, ते प्रश्न हाती घेऊन काँग्रेस जनतेला न्याय देण्यासाठी लढत आहे. सध्या निवडणुका नाहीत त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही, जे लोक त्यावर चर्चा करत असतील तर त्यांना करु दया. मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय जनताच करेल. ज्या पक्षाला जनता आशिर्वाद देईल त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल.

राज्यात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षच नंबर एकचा पक्ष म्हणून विजयी झालेला आहे. जनतेचा विश्वास काँग्रेस पक्षावर आणखी दृढ झालेला आहे. भारतीय जनता पक्ष शेतकरी विरोधी असल्याने बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांचा धुव्वा उडाला आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Check Also

पिडीत महिला अपहरण प्रकरणी एच डी रेवन्ना यांना अटक

हसन लोकसभा मतदारसंघातील जनता दल-भाजपाचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने घरातील महिलेवरच जबरदस्ती करत बलात्कार केल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *