Breaking News

संजय राऊत यांचा “त्या” व्हिडिओवरून सवाल, भाजपाचं हिंदूत्व इथे काय करत होते? फडणवीस आणि पोलिस खात्याला दिले चौकशीचे आव्हान

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते मोहित कंबोज यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. मोहित कंबोज रात्री साडेतीन वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत असल्याचा दावा त्यांनी केला. याप्रकरणी गृहमंत्री आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याचीही मागणी केली.

संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये सचिन कांबळे मोहित कंबोज यांच्याबाबत दावा करत आहेत. लिंक रोड खार पश्चिम येथील रेडिओ बार येथे देवेंद्र फडणवीस यांचे खास मोहित कंबोज मुलींना घेऊन नाचत आहेत, धिंगाणा घालत आहेत, असा दावा केला आहे. रात्री साडेतीन वाजता त्यांनी हा व्हिडीओ शूट केला आहे. येथे कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? असा प्रश्नही त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे. बेधुंद अवस्थेत, नशा करून ते मुलींसोबत नाचत आहेत, असंही ते म्हणाले. आमच्या सभा साडेदहा वाजताच बंद करता आणि मग यांना साडेतीन वाजेपर्यंत मुलीसोबत कसे नाचू शकतात, असा सवालही कांबळे यांनी यावेळी उपस्थित केला.

सचिन कांबळे यांचा हाच व्हिडीओ संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे शेअर केला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुंबई पोलीस आयुक्त आणि नार्कोटिक्स ब्युरोला टॅग करत त्यांनी, महाशय आपण काय कारवाई केली ते जनतेला कळू द्या. येथे अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री होत असल्याची माहिती आहे. भाजपाचे हिंदुत्व येथे काय करीत होते? सीसीटीव्ही फुटेज लगेच ताब्यात घ्या. खोक्यांचे राज्य हे अंमली पदार्थांचे राज्य होऊ नये, असं ट्विट राऊतांनी केलं आहे.

यानंतर त्यांनी आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये रेडिओ बारमधील दृश्य दिसत आहेत. पहाटे ३ः३०, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोणाच्या खिशात आहेत? शेवट पर्यंत पहा. पोलिस हतबल आहेत.. हे तर काहीच नाही.. कायद्याचे धिंडवडे काढणारे फुटेज मी पोलिस आयुक्तांना पाठवत आहे.. मी वाट पाहतोय पोलिस काय कारवाई करत आहेत.. हिंदुत्व नशेच्या व्यापारात अडकले आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्या, नाहीतर मी पाठवेन. आतमध्ये काय झालं याबाबतीतल सर्व फुटेज माझ्याकडे आहे. पण सरकार काय करतय? गृहमंत्री कोणाला पाठिशी घालतायत का हे मला पाहायचंय, असंही संजय राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *