Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांची टीका, उबाठा रंग बदलणारा सरडा

युतीमध्ये असताना उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान गात होते. आता मोदी यांच्या नावाने खडे फोडत असून इतक्या झटपट रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिला, अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. सभेपूर्वी छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौक ते गुलमंडी दरम्यान प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारोंच्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या निवडणुकीत गडबड झाली. पण या निवडणुकीत दोघांच्या भांडणात धनुष्यबाणाला लाभ होणार आणि महायुतीचा उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होणार, असा विश्वास व्यक्त करत पुढे म्हणाले की, ही निवडणूक देशाच्या विकासाची प्रगती आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याची आहे. बाळासाहेब ठाकरेंची घोषणा होती, गर्व से कहो हम हिंदू है, अब की बार चारसो पार मध्ये इथला उमेदवार पहिले हवेत. २०१४ नंतर दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट करण्याची हिंमत केली नाही. कारण मोदींनी दहशतवाद रोखला असा दावाही यावेळी केला.

पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मोदींकडून ८० कोटी गरिबांना मोफत रेशन देण्यात येत आहे. त्यात फक्त हिंदू आहेत का? असा सवाल करत आम्हाला मिंधे म्हणतात, नीच म्हणतात, खालच्या भाषेत टीका करतात हे तुम्हाला पसंत आहे का? सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे सहन होत नसल्याने शिवी देण्याचे प्रकार सुरु आहेत. हा शेतकरी, कष्टकरी, माता भगिनींचा अपमान आहे असा पलटवारही यावेळी केला.

मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, मी या आरोपाला कामाने उत्तर देतो. सूज्ञ मतदार मतपेटीतून उत्तर देऊन उबाठाला घरी बसवतील ही काळ्या दगड्यावरील भगवी रेघ आहे, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका करता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आयरे-गैरे व्यक्तींचा इतिहास सर्वांना माहित असल्याने त्यांच्याबाबत न बोललेले बरे, असा टोलाही यावेळी लगावला.

संजय राऊत आणि चंद्रकांत खैरे, विनोद बनकर यांनी दलित बांधवांना स्टेजवरून खाली उतरवले हा दलितांचा अपमान आहे. काँग्रेसने दलित आणि मुस्लिमांचा केवळ व्होटबॅंक म्हणून वापर केला. दलित बांधवानी या अपमानाचा बदला घेऊन महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *