Breaking News

पियुष गोयल यांच्या विरोधात बातमी छापल्याने पत्रकाराला धमकी

मुंबई उत्तर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या “गोयल यांना सोसवेना मासळीचा वास” या मथळ्याखाली एका दैनिकात बातमी प्रकाशित झाल्यानंतर काही अज्ञात कार्यकर्त्यांनी संबंधित बातमी देणाऱ्या  महिला पत्रकाराला घरी जाऊन धमकावल्याची धक्कादायक बाब घडली.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली (प) येथिल बाभई व वझिरा येथे प्रचार करताना माशांचा वास सहन न झाल्याने नाकाला रूमाल लावला होता. या घटेनेची बातमी नवाकाळ या दैनिकात १४ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर मुंबई काँग्रेसने कांदिवली येथे पियुष गोयल यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. पियुष गोयल यांच्या संदर्भात ” पियुष गोयल यांना सहन होईना मासळीचा वास” ही बातमी नवाकाळ मध्ये छापून आल्याने दुखावलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत काल सोमवारी रात्री १० वाजता नवाकाळच्या पत्रकार नेहा पुरव यांच्या बोरीवलीतील घरी जावून, पुन्हा मच्छिमारांची बातमी आली नाही पाहिजे असे धमकावले.

पत्रकार नेहा पुरव यांना दिलेल्या या बातमीचे तीव्र पडसाद उमटले असून, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांवर कडक कारवाई करावी,अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, सरचिटणीस प्रविण पुरो यांनी केली आहे. मुंबई प्रेस क्लब, मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई हिंदी पत्रकार संघासह अनेक संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी याचा निषेध करीत संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे.काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी धमकी देणा-या गुंडांना अटक करण्याची मागणी केली आहे.माध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. महाराष्ट्राला निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेचा मोठा वारसा आहे.स्वातंत्र्यपूर्वीपासून महाराष्ट्राच्या भूमितीतील पत्रकारांनी लोकशाहीला समृद्ध करण्याचे आणि दिशा देण्याचे कार्य केले आहे पण केंद्रातील भाजप सरकारला लोकशाही नको आहे.म्हणून त्यांनी लोकशाहीचे चारही स्तंभ आणि स्वायत्त संस्थावर हल्ले करणे सुरु केले आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल भाजपची हीच कार्यपद्धती पुढे घेऊन जात आहेत.हायप्रोफाईल कुटुंबातून आलेल्या गोयल यांना मासळीचा वास आणि निष्पक्ष पत्रकारिता सहन होत नाही.त्यामुळेच त्यांच्या गुंडानी नेहा पुरव यांना धमकी दिली आहे. पत्रकरांना धमक्या देऊन पियुष गोयल आपला पराभव टाळू शकत नाहीत असा टोला अतुल लोंढे यांनी लगावला आहे.

Check Also

फुटपाथवर राहणाऱ्या बेघर लोकांचे अप्रतिम छायाचित्रण

आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांना कॅमेऱ्यातून फोटो क्लिक करताना पाहिले असेल, पण आम्ही तुम्हाला फूटपाथवर राहणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *