Breaking News

पंतप्रधान मोदी यांचा आरोप, ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कट

कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने मुस्लिमांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केले आणि ओबीसी समाजाचे संपूर्ण आरक्षण काढून घेऊन रातोरात मुस्लिमांना वाटून टाकले, आता हाच फॉर्म्युला देशभर राबविण्याचा काँग्रेसचा कट आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोल्हापूर येथे जाहीर सभेत बोलताना केला.

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, राजर्षि शाहू महाराज यांची पवित्र भूमी असलेल्या करवीर नगरीला व कोल्हापूरवासीयांना प्रणाम करून मोदी यांनी आपल्या भाषणाचा प्रारंभ केला. त्या आधी अबकी बार, चारसो पार अशा घोषणा देत आणि जय श्रीरामाचा जयघोष करत कोल्हापूरकरांनी मोदी यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस, इंडी आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या उबाठा गटावर जोरदार हल्ला केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर भाजपा आणि एनडीए दोन विरुद्ध शून्य गुणांनी आघाडी घेतली आहे. इंडी आघाडीने द्वेषाच्या राजकारणामुळे सेल्फ गोल करून घेतला आहे. त्यामुळे आता फिर एक बार, गरीबो की सरकार, एसटीएसटी ओबीसी सरकार, युवा, विकास, महिला, शेतकऱ्यांचे सरकार, फिर एक बार… अशी घोषणा देत मोदी यांनी महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, यावेळी कोल्हापूरकर असा गोल करतील, की ज्यामुळे पुढचे सारे टप्पे इंडी आघाडीवाले पूर्ण चीत होतील, असा विश्वास व्यक्त करून, जगात भारी कोल्हापुरी अशी घोषणाही मोदी यांनी दिली. विकसित भारताच्या संकल्पाची ही निवडणूक आहे, पण विकासाच्या मुद्द्यावर आपण एनडीएची बरोबरी करू शकत नाही याची जाणीव जेव्हा काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना झाली, तेव्हा त्यांनी आपली रणनीती बदलली, आणि देशविरोधी अजेंडा व तुष्टीकरणाचा वापर सुरू केला. आता सत्तेवर आल्यावर कलम ३७० पुन्हा आणण्याचा काँग्रेसचा अजेंडा आहे, पण काँग्रेसचा हा मनसुबा जनता हाणून पाडेल, सीएए कायदा रद्द करण्याचा प्रयत्न केलाच, तर त्यांची हालत काय होईल हे त्यांना माहीत नाही. ज्यांना तीन अंकी आकडा गाठता येणार नाही, ते सत्तेच्या दरवाजापर्यंत तरी पोहोचतील का, असा सवालही यावेळी केला.

काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आता ‘एक साल एक पीएम’ हा फॉर्म्युला बनवायला ते निघालेत, पाच वर्षांत पाच पंतप्रधान, असा खेळ खेळायची आखणी ते करत आहेत, पण हा फॉर्मुला बनवणाऱ्यांना देश कधीच सहन करणार नाही याची जाणीव झाल्यामुळे, आता ते देशावर राग काढत आहेत. दक्षिण भारताला तोडून अलग देश करण्याची मागणी ते करत आहेत. ‘अहत पेशावर, तहत तंजावर हिंदवी स्वराज्य’ ही घोषणा ज्या भूमीत झाली, ती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, काँग्रेसच्या अशा अजेंड्याला मान्यता देणार नाही, असा इशाराही दिला.

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, लांगूलचालन व वोट बँकेचे राजकारण करणाऱ्या काँग्रेस आघाडीची नजर आता लोकांची कमाई व दलित, मागासवर्गीयांच्या संपत्तीवर पडली आहे. या देशाच्या साधनसंपत्तीवर ज्यांचा पहिला हक्क आहे असे काँग्रेस मानते, त्यांना तुमची कमाई काढून घेऊन वाटण्याचा काँग्रेसचा कट आहे, असा आरोपही यावेळी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, एनडीएने आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून, स्टार्टअप इंडियामधून देशातील जनतेसमोर संधींची द्वारे खुली केली, ज्या युवकांना काँग्रेसने रोजगार आणि नोकऱ्यांसाठी वणवण करायला लावली, तो युवक आता यशस्वी व आत्मनिर्भर होऊन जगाच्या पाठीवर अभिमानाने मिरवत आहे, असा दावाही केला. येत्या पाच वर्षांत विकासाच्या प्रत्येक टप्प्यातील यशाचा वाटा जनतेला मिळेल ही मोदी की गॅरंटी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

Check Also

पंतप्रधान मोदी यांची सवाल, राहुल गांधी यांनी अंबानी, अदानीवरील टीका अचानक का थांबवली?

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यापासून काँग्रेस पक्षाने अंबानी आणि अदानी यांच्यावरील कडवट टीका थांबवल्याचा आरोप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *