Breaking News

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती गतवेळेपेक्षा कमी आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारेमाप आरोपाला महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने सडेतोड उत्तर दिले जात आहे. यापार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट आवाहन करत त्यांचे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याऐवजी आमच्यासोबत या असे आमंत्रणच दिले. या आवाहनावर शरद पवार यांनी खोचक प्रत्युत्तर देत मोदींचे आमंत्रण धुडकावून लावले.

शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आमंत्रणाबाबत विचारले असता म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आतापर्यंत पाच ते सहावेळा महाराष्ट्रात आले, आता ते पुन्हा महाराष्ट्रात आले अशी आश्चर्यकारकरित्या विचारत नरेंद्र मोदी यांच्यामुळेच देशातील लोकशाही संकटात आली आहे. तसेच देशाची संसदीय प्रणाली आणि राज्यघटना ही धोक्यात आलेली आहे. त्यांचा पराभव करणे हेच आमचे ध्येय असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, हा देश एकसंध ठेवायचा आहे, या देशाच्या एकसंधतेला जेथे धोका निर्माण होता, त्या ठिकाणी मी माझे सहकारी हे कधीच असणार नाहीत. त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान असताना ते फक्त हिंदू आणि मुस्लिम अशी दोन वेगवेगळी मांडणी करत आले आहेत. देशातील हिंदू, मुस्लिम, शीख ईसाई, जैन या सर्वांना एकत्रित घेवू पुढे देशाला पुढे न्यायचे आहे. मात्र पंतप्रधान मोदी यांची या काळातील काही भाषणे पाहिली तर फक्त दोन धार्मिक समाजाचा उल्लेख केला जात आहे. त्यामधून दोन समाजात गैरसमाज निर्माण होत आहे. त्यामुळे देशाच्या एकसंधतेला धोका निर्माण होत आहे आणि त्यांची भाषणा त्यावरच असतात. त्यामुळे जी गोष्ट देशहिताची नाही तेथे मी आणि माझे सहकारी कधीही राहणार नाही असेही सांगितले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, आतापर्यंत देशात जे काही तीन चार टप्प्यात मतदान झाले. त्यावरून एकंदर चित्र हे मोदींच्या विचाराच्या वितरीत दिसत आहे, तसेच त्यांनी जे काही निर्णय घेतले नेमके त्याच्या विरोधात दिसत आहे. त्यांनी स्विकारलेल्या विचाराच्या विरोधात जनमत तयार व्हायला व्यक्त होण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत, ही त्यांची अस्वस्थता ही विधान हेच सांगतात किंवा गोंधळ निर्माण करणारी भूमिका सांगतात असेही स्पष्ट केले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, एससी आणि एसटीचे आरक्षण वाढविण्याला कोणाचा विरोध नाही आरक्षण अवश्य वाढवा. पण एखाद्या समाजासंबधी राज्यकर्त्यांनी अशी भूमिका घेऊन कशी चालेल? असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान हे सगळ्यांचे असतात, संपूर्ण देशाचे असतात, जे देशाचे नेतृत्व करतो त्यांनी एका धर्माचा, जातीचा, भाषेचा विचार करण्यास सुरुवात केली. तर या देशाचं ऐक्य संकटात येईल मग ते पंतप्रधान असो किंवा मंत्रिमंडळातील मंत्री असो अशी उपरोधिक टीकाही यावेळी केली.

शेवटी बोलताना शरद पवार म्हणाले की, आज या देशात संसदीय लोकशाही पध्दती मोदींमुळे संकटात आली असं माझं स्वच्छ मत आहे. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उचलून तुरुंगात टाकतात, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबले आहेत. यांच्यामागे केंद्रीय नेतृत्वाची, केंद्र सरकारचा सहभाग असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, लोकशाही पध्दतीवर कोणाचा किती विश्वास आहे. ज्या व्यक्तीचा, ज्या धोरणाचा, ज्या पक्षाचा, ज्या विचारधारेचा संसदीय लोकशाही पध्दतीवरच विश्वास नाही असा समज लोकांमध्ये पक्का झाला असेल, त्यांच्यासोबत असोशिएशन, व्यक्तीगत सोडा, राजकिय ही माझ्याकडून कधीही होणार नाही असेही स्पष्ट केले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *