Breaking News

पंतप्रधान मोदी यांचे शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमंत्रण, आमच्यासोबत या

देशात सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील भाजपा उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नकली पुत्र म्हणून उद्धव ठाकरे यांचा कुत्सित उल्लेख केल्याचे प्रकरण ताजे आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना लोकसभा निवडणूकीनंतर दोन पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे वक्तव्य करत राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. त्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदूरबार येथील सभेत बोलताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत यावे असे थेट आमंत्रणच या दोन्ही नेत्यांना दिले.

पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकसभा निवडणूकीनंतर जे ओबीसीचे आरक्षण काढून घेऊन त्या विशिष्ट समाजातील लोकांना देणार आहेत, त्यांच्यासोबत जाण्यापेक्षा शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत आमच्यासोबत यावे असे आमंत्रण शरद पवार आणि उद्धव ठाकरे याना दिले.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आदिवासींची सेवा ही कुटुंबाची सेवा आहे. या भागात जंगलात राहणाऱ्या लोकांना पाणी आणि विजेची खूप समस्या होती. पण आमच्या सरकारने तो प्रश्न सोडवला असून पीएम आवास अंतर्गत १.२५ लाख लोकांना घरे देण्यात आली आहेत. आता जी कुटुंबे यापासून वंचित आहेत अशांचा शोध घ्या तसेच ज्या कुटुंबांना गॅस, घर किंवा पाणी मिळालेले नाही त्यांची नावे पाठवा, असे आवाहनही केले. आपल्या सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये तीन कोटी लोकांना कायमस्वरूपी घरे मिळतील, या हमीचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. सध्याची कामे हा फक्त ट्रेलर असून अजूनही लोकांसाठी खूप काही करायचे आहे. आदिवासी भागातील एक मोठी समस्या असलेल्या सिकलसेल ॲनिमियासाठी काँग्रेसने काहीही केले नाही. या आजाराचा कायमचा नायनाट करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. कुपोषण ही आदिवासी समाजातील समस्या असली तरी ही समस्यादेखील आम्ही कायमची संपविणार आहोत. यापुढे कुपोषणाचा एकही बळी होऊ नये, यासाठी येथील १२ लाख लोकांना मोफत रेशन देण्यात आल्याचे सांगितले.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नकली शिवसेनेचाही जोरदार समाचार घेतला. काँग्रेस सतत खोटे बोलत असून धर्माच्या आधारे आरक्षण देऊन काँग्रेसने संविधानाच्या पाठीत वार करण्याचे पाप केले आहे. आदिवासी, मागासवर्गीयांचे आरक्षण हिसकावून ते अल्पसंख्याकांना देण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ट असून कर्नाटकातील मुस्लिमांना रातोरात मागास करण्यात आले, त्याप्रमाणे कर्नाटकचे मॉडेल संपूर्ण देशात लागू करण्याचा काँग्रेसचा कट आहे. ही महाविकास आघाडी आरक्षण खाऊन टाकण्याची मोठी मोहीम राबवत आहे, असा आरोप करून मोदी म्हणाले, एससी, एसटी, ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी मी महायज्ञ करत आहे. आरक्षणाचे तुकडे करणार नाही आणि त्यातील कोणताही भाग मुस्लिमांना देणार नाही, याची ग्वाही काँग्रेसने द्यावी अशी आमची मागणी होती, परंतु मात्र काँग्रेसकडून याला प्रतिसाद मिळाला नाही असेही यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसने स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासींचे योगदान विसरून स्वातंत्र्याचे संपूर्ण श्रेय एकाच कुटुंबाला दिले. स्वातंत्र्यात आदिवासींचे योगदान दर्शविण्यासाठी आम्ही एक संग्रहालय बांधत आहोत. आम्ही पहिल्यांदा एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवले. मात्र एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती होण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेसने रात्रंदिवस काम केले, अशा शब्दांत काँग्रेसच्या राजकारणावर कोरडे ओढले. राहुल गांधींचे परदेशात राहणारे गुरू सॅम पित्रोदा हे वर्णभेद पाळतात, ज्यांचा रंग कृष्णासारखा आहे त्यांना काँग्रेस आफ्रिकन मानते, आणि काँग्रेस आदिवासींचा बदला घेण्यासाठी रंगांची चर्चा करते, अशी टीकाही केली.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, बारामती मध्ये झालेल्या मतदानानंतर शरद पवार हे चिंतेत आहेत. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करूनच काँग्रेसमध्ये विलीन होण्याची तयारी चालविली आहे. चार जूनच्या निकालानंतर नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार हे लक्षात ठेवा आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपले स्वप्न पूर्ण करा, असे आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *