Breaking News

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व केवळ राजकीय द्वेषातून केलेला आहे. मोदी सातत्याने सनातन धर्म, अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख करत काँग्रेस व विरोधी पक्षांना हिंदू विरोधी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतात. नरेंद्र मोदी जातीच्या व धर्माच्या नावाने समाजात द्वेषाचे विष पसरवण्याचे पाप करत आहेत, असे प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

नरेंद्र मोदी व भाजपाचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा व नरेंद्र मोदींनी बजरंग बलीच्या नावाने मते मागितली परंतु बजरंग बलींनी भाजपाच्या डोक्यावर गदा घालून सपशेल आपटले. आताही मोदी धार्मिक मुद्दे पुढे करत प्रभू रामाच्या नावावर मते मागत आहेत पण प्रभू रामचंद्रही बजरंग बली प्रमाणे भारतीय जनता पक्षाला जागा दाखवतील. खोटी आश्वासने देऊन १० वर्ष सत्ता मिळवली, या १० वर्षात काय काम केले हे मोदी सांगू शकत नाहीत. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांच्याबद्दल ते बोलू शकत नाहीत म्हणून प्रत्येक सभेत मोदी धर्माच्या नावावर मते मागत आहे. हिंमत असेल तर मोदींनी विकासाच्या नावावर मते मागून दाखवावी.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्ष संविधान बदलून धर्माच्या आधारावर आरक्षण देऊन ओबीसींचे आरक्षण हिरावणार असा खोटा प्रचार मोदी करत आहेत. भाजपानेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान, दलित, अल्पसंख्याक समाजाचा सतत अपमान केला, मोदी सरकारच्या काळातच या समाजावर प्रचंड अत्याचार करण्यात आले. भाजपाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पायदळी तुडवले. संविधान बदलाची भाषा भाजपाच करते आणि वरून काँग्रेसवर आरोप करतात याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. ओबीसींचे राजकीय आरक्षण भारतीय जनता पक्ष,नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनीच घालवले आहे. राज्यात मराठा धनगर आदिवासी समाजाला आरक्षण देतो म्हणून त्यांची फसवणूकही भाजपानेच केली आहे परंतु खोटे बोल पण रेटून बोल हीच भाजपाची निती असल्याची टीकाही केली.

नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, इंडिया आघाडीचे सरकार आले की पैसे मिळवण्याचा त्यांचा मनसुबा आहे, सरकार बनाओ, नोट कमाओ, असे मोदी म्हणाले पण इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल केली, मोदींची चोरी सुप्रीम कोर्टाने पकडली आणि आरोप मात्र इंडिया आघाडीवर करतात, हे मात्र अजब आहे. इंडिया आघाडीचा एकाही जागेवर विजय होऊ देऊ नका असे जाहीरपणे सांगणे ही हूकूमशाही वृत्ती आहे.पराभव दिसत असल्याने निराशेतून मोदी काहीही बडबड करत आहेत अशी खोचक टीकाही यावेळी केली.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *