Breaking News

जयंत पाटील म्हणाले, आम्ही बोलूच, पण ती माहिती जरा पुढे येवू द्या बंडखोर आमदारांना दिलेल्या सोयी-सुविधांवरून जयंत पाटील यांचा भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा

शिवसेनेतील बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एका गटाने पहिल्यांदा सुरत आणि नंतर गुवाहाटी येथे गेले आणि तेथून बंडाचा झेंडा रोवला. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, या सर्वामागे कोण आहे याबद्दल आम्ही बोलूच पण त्या आमदारांना कोणी विमान सेवा पुरविली, त्यांची पंचताराकींत हॉटेलमध्ये सोय कोणी केली ती माहिती जरा बाहेर येवू द्या आम्ही बोलूच असे सांगत यामागे भाजपा असल्याचा सूचक वक्तव्य केले.

जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांवर विश्वास दर्शवला आहे. सरकार राहावं हीच आमची भूमिका आहे. शेवटपर्यंत हे सरकार टिकावं यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या पाठिशी उभं राहाण्याचे निर्देश शरद पवार यांनी आम्हाला दिले आहेत. अशा प्रकारच्या आणीबाणीच्या परिस्थितीतून शरद पवार नेहमीच मार्ग काढत आले आहेत. आज आमदार ब्लॅक कॅट कमांडोंच्या घेरावात अडकले आहेत. एका हॉटेलमध्ये किल्ल्याचं स्वरूप करून तिथे त्यांना ठेवलं आहे. जेव्हा हे आमदार मुंबईत येतील आणि उद्धव ठाकरेंसमोर जातील, तेव्हा हे चित्र बदलेल असा आम्हाला विश्वास असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी जयंत पाटील यांनी शिवसेनेच्या आमदारांच्या बंडखोरीमागचं खरं कारण योग्यवेळी सांगेन, असं सूचक विधान केले. अशा गोष्टी होतच असतात. आमदारांची कामं कधी होतात, कधी होत नाहीत. वरिष्ठांच्या भेटी कधी होतात, कधी होत नाहीत. पण त्याचा परिणाम सरकारवर कधी होत नसतो. पण काही वेगळ्या कारणाने काही लोक बाजूला जात असतील, तर ती कारणं समोर येत नाहीत. फक्त हिंदुत्वाचा मुद्दा समोर येतो. पण खरं कारण काय आहे, ते योग्य वेळी मी तुम्हाला सांगेन असेही त्यांनी सांगितले.

आज हे सरकार टिकवण्यासाठी शिवसेनेच्याच आमदारांना टिकवणं महत्त्वाचं पण अडचणीचं झाले आहे. परिस्थिती बदलली आहे. शिवसेना एकगठ्ठा राहिली, तर आजही हे सरकार टिकेल. शरद पवार स्वत: त्यासाठी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटून आल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी कधीही शिवसेना आमदारांसारखी भूमिका घेतली नाही. आमच्या सरकारने अनेक चांगले उपक्रम केले. आज दुर्दैवाने काही शिवसैनिक सांगत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नको. अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापन करून तिन्ही पक्षांनी एकत्र काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी काहीही अडचण असली, तरी इतर पक्षांच्या विरोधात भूमिका घेतली नाही. उलट, शरद पवारांनी निर्णय घेतला, तर त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहू अशी भूमिका त्यांनी घेतली. माझ्या पक्षाच्या आमदारांनी उघडपणे कधी अशी भूमिका घेतली नाही. विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीतही आमचा पक्ष एकसंध राहिला असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *