Breaking News

मुंबई उपनगरात २६ एप्रिलपासून लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी जारी होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली असून आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. मतदानाची टक्केवारी ही राष्ट्रीय व राज्य सरासरीपेक्षा जास्त असावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून जिल्ह्यातील मतदारांनी त्यांना दिलेला मतदानाचा हक्क जरुर बजावावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्ग क्षीरसागर यांनी केले आहे. या निवडणुकीत मतदारांना वाढत्या उन्हाचा त्रास होऊ नये आणि लवकरात लवकर मतदान केंद्रांवर मतदान करुन जाता येईल, या दृष्टीने नियोजन केल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

२६ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम. २८- मुंबई उत्तर पूर्व, २९- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात शुक्रवार २६ एप्रिल २०२४ पासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरवात होईल. या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने केलेली तयारी पूर्णत्वास आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, निवडणूक उपजिल्हाधिकारी तेजस समेळ उपस्थित होते.

जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले की, लोकसभेच्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघांत विधानसभेच्या २६ मतदारसंघांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मतदारांची संख्या ७४ लाख ७ हजार ८७९ मतदार असून पुरुष मतदारांची संख्या ३९ लाख ८२ हजार ५९०, तर महिला मतदारांची संख्या ३४ लाख २४ हजार ४७७ एवढी आहे. याशिवाय तृतीयपंथी मतदारांची संख्या ८१२ एवढी आहे. दिव्यांग मतदारांची संख्या १५ हजार ९५८, तर ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या ९८ हजार १७४ आहे. या चारही मतदारसंघात मतदान केंद्राची ठिकाणे १ हजार ८३ असून मतदान केंद्रांची संख्या ७ हजार ३५३ एवढी आहे. ८५ वर्षांवरील मतदार आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणपत्र दिलेल्या मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्यापर्यंत मतदान कर्मचारी पोहोचले असून त्यांच्याकडून पर्याय भरुन घेण्यात आले आहेत. एकूण मतदान केंद्रांपैकी ५० टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग केले जाणार आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यास २६ एप्रिल २०२४ पासून सुरवात होईल. ३ मे २०२४ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. ४ मे २०२४ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. ६ मे २०२४ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. २० मे २०२४ रोजी मतदान होईल, तर ४ जून २०२४ रोजी नेस्को, गोरेगाव व उदयांचल शाळा, गोदरेज संकुल, विक्रोळी येथे मतमोजणी होईल. याबरोबरच प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय आदर्श मतदान केंद्रे असणार आहेत. त्यापैकी एका केंद्रांचे संपूर्ण संचलन महिला कर्मचारी, एका मतदान केंद्राचे संपूर्ण संचलन तरुण अधिकारी आणि तिसऱ्या मतदान केंद्राचे संपूर्ण संचलन दिव्यांग कर्मचारी करतील. मतदान केंद्रांवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मंगळवार २३ एप्रिल २०२४ पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.

…तर मतदारांच्या सोयीसाठी विशेष कलर कोड

पाचपेक्षा अधिक मतदान केंद्र ज्या ठिकाणी असतील तिथे मतदारांच्या सोयीसाठी रंगसंगतीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय व्यवस्थापन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मतदान केंद्र मतदारांसाठी सुलभ होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मतदान केंद्रांवर पाणी, वीज, सावलीची सुविधा असेल. दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचणे सुलभ व्हावे यासाठी बेस्टसह प्रवासी वाहतुकदारांशी समन्वय साधला जात आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांच्या मार्गावर ही वाहने मोफत चालविली जातील.

आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरु

मुंबई उपनगर जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्या दिवसापासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. फिरते पथक, बैठे पथक, व्हीडिओ व्हीजिलिंग पथक, व्हीडिओ व्ह्यूइंग पथक, खर्च सनियंत्रण पथकासह विविध ५५० पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांच्या कामाचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे. याशिवाय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यास्तरावर एक खिडकी कक्ष विविध परवानग्यांसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. सी- व्हीजिल ॲपवर १८८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारी वेळेत निकाली काढण्यात आल्या आहेत. तसेच ग्रीव्हन्स ॲपवर २२५१ तक्रारी, विचारणा करण्यात आली होती. या सर्वांचेही निराकरण करण्यात आले आहे, असेही जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *