Breaking News

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी काँग्रेस प्रणित युपीए सरकारने शिक्षण हक्क कायदा केला. भाजपाप्रणित शिंदे सरकारने मात्र या कायद्यात मनमानी व बेकायदेशीर बदल करून वंचित व दुर्बल घटकांतील लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा आणली आहे. गोरगरीब, वंचित आणि बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा मनुवादी निर्णय असल्याचा हल्लोबोल करत काँग्रेस पक्ष हे कदापी सहन करणार नाही. सरकारला याप्रश्नी जाब विचारू व वेळ पडली तर न्यायालयातही दाद मागू, असा इशारा मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिला.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड यांनी भाजपा-शिंदे सरकारचा खरपूर समाचार घेतला. आरटीई मधील कलम १२ नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये कमीत कमी २५ टक्के जागा वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवणे व ८ वी पर्यंत मोफत शिक्षण बंधनकारक आहे. या कलमानुसार ज्या खासगी विनाअनुदानित शाळांच्या १ किमी. परिसरात शासकीय किंवा अनुदानित शाळा आहेत, अशा शाळांना २५ टक्के प्रवेशांबाबतची अट लागू नसेल, असा बदल भाजपा शिंदे सरकारने केला आहे. शिक्षण संचालकांचे दिनांक १५-४-२०२४ चे यासंर्भातील पत्र आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर तसेच इतर शहरांमध्ये एकही अशी विनाअनुदानित शाळा नसेल ज्याच्या १ किमी. अंतरावर शासकीय किंवा अनुदानित शाळा नाही. मूळ आरटीई कायद्यामध्ये शाळांमधील अंतराबाबत कोणतीही अट नाही, त्यामुळे शिंदे भाजपा सरकारचा हा बदल बेकायदेशीर असून हा निर्णय खाजगी शिक्षण सम्राटांच्या हिताचा आणि गरिब, दुर्बल घटकांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रकार आहे.

पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने शिक्षण हक्क कायदा, २००९ (आरटीई) अंमलात आणला. या कायद्याचा हेतू हा गरिब व दुर्बल कुटुंबातील मुलांना हक्काचे शिक्षण मिळाले पाहिजे, परंतु भारतीय जनता पक्षाचे सरकार बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू पहात आहे. आरटीई मध्ये बदल करुन भाजपा सरकारने गरिबांच्या शिक्षणाचा मूलभूत अधिकार हिरावून घेतला आहे. या निर्णयामुळे शहरांतील गरीब विद्यार्थ्यांसाठी विनाअनुदानित शाळांचे दरवाजे कायमस्वरूपी बंद केले आहेत. तसेच ग्रामीण भागातही अनेक विनाअनुदानित शाळा या निर्णयामुळे आरटीईमधून हद्दपार होतील अशी भीतीही यावेळी व्यक्त केली.

वर्षा गायकवाड शेवटी म्हणाल्या की, भाजपा-शिंदे सरकारने शिक्षणाचा खेळखंडोबा करुन ठेवला आहे. सरसकट समूह शाळा योजना, शाळा दत्तक योजना, कंत्राटी शिक्षक भरती व आता आरटीईमधील बदल हे धनदांडग्यांचे हित जपणारे आहे. सर्वसामान्य घटकांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून महात्मा फुले, सावित्रिबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले आयुष्य वेचले. या महापुरुषांच्या विचारांना भाजपा-शिंदे सरकार तिलांजली देत आहे. आरटीईमधील बदलाच्या निर्णयाला काँग्रेस पक्षाचा विरोध असून बहुजनांच्या मुलांना न्याय देण्यासाठी सर्व स्तरावर संघर्ष करु, असे प्रतिपादनही यावेळी केले.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *