Breaking News

शरद पवार यांचा हल्लाबोल, नरेंद्र मोदींचे भाषण म्हणजे लबाडाघरचं आवताण…

सामान्य माणसाची महागाईतून सुटका केली नाही. १० वर्षांत स्वतः काही केले नाही, आणि हिशेब आम्हाला मागतात. मोदींनी गेल्या दहा वर्षात एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. लबाडाच्या घरचे अवताण जेवल्याशिवाय खरं नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहिर सभेत शरद पवार बोलत होते.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वातंत्र्यपूर्वीचा काळ आणला आहे. आदिवासींची स्थिती खालावली आहे. मोदींनी गेल्या दहा वर्षांत फक्त महात्मा गांधी, पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंवर टीका केली. जे लोक हयात नाही, त्यांच्यावर ते टीका करतात. मात्र त्यांनी दहा वर्षात काय केले या संदर्भात काहीही बोलत नाही अशी उपरोधिक टीकाही यावेळी केली.

भाषणादरम्यान शरद पवार यांनी आपल्या मोबाईलमधून नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली दिलेल्या आश्वासनाचं जुनं भाषण ऐकवलं. मोदी यांचं भाषण म्हणजे लबाडाघरचं आवताण जेवल्याशिवाय राहत नाही, अशी अवस्था असल्याचा टोलाही यावेळी लगावला.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, २०१४ मध्ये मोदींनी सांगितले की आम्ही बेरोजगारी संपवू. बेरोजगारीचे सर्वेक्षण करणाऱ्या जागतिक दर्जाची संस्था इंटरनॅशनल लेबर ऑर्गोनायझेशनने सर्वेक्षण केले त्यात भारतात बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे सांगत आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. त्यांनी गेल्या दहा वर्षांत काय केले? पंतप्रधान मोदींनी दहा वर्षात नोटाबंदी केली. त्यामुळे सामान्य लोकांना कित्येक दिवस रांगेत उभे राहावे लागले. देशभरात ७०० लोकांचा बँकांच्या रांगेत उभे राहून मृत्यू झाला. बेरोजगारी वाढली, महागाई वाढली. त्यावर मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत नाहीत असाही आरोपही केला.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, पन्नास दिवसाच्या आत आपण पेट्रोलची किंमत कमी आणू, अस मोदी यांनी सांगितलं होतं. मोदींच्या आश्वासनाला ३ हजार दिवस उलटून गेले. तरी ७१ रुपये पेट्रोलची किंमत १०६ रुपये झाली. गॅस सिलिंडर ही महागला. आज देशात १०० पैकी ८७ तरुण बेरोजगार आहेत. मोदी हे आम्हाला, उद्धव ठाकरे यांना शिव्या देतात. शिव्या द्या, पण तुम्ही १० वर्षात केलं काय? फक्त नोटाबंदी केली असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

यावर सविस्तर बोलताना शरद पवार म्हणाले की, मोदींची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने सुरू आहे. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यावर टीका केली जाते. ज्यांनी देशासाठी योगदान दिलं त्यांच्यावर टिका केली जाते. जवाहरलाल नेहरूंपासून राहुल गांधी यांच्यापर्यंत सगळ्यांवर टीका केली जात आहे. जवाहरलाल नेहरू यांनी आपलं आयुष्य तुरुंगात घालवलं. देशासाठी काम केलं, हे आपण विसरू शकत नाही. मात्र, त्यांच्यावर मोदी टीका करतात. इंदिरा गांधी , मनमोहन सिंह अशा सर्वच प्रधानमंत्र्यांनी देशाचा विचार केला. पण मोदी यांनी देशाचा विचार केला नसल्याचा आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली म्हणून केजरीवालांना तुरुंगात टाकले. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केंद्र सरकारवर टीका केली, तर तिथेही त्यांना तुरुंगात टाकले. इंग्रजांसारखे काम सध्या केंद्रातील सरकार करत आहे. देश हुकूमशाहीच्या दिशेने जात आहे अशी भीतीही यावेळी व्यक्त केली.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या विरोधात सीबीआयकडून ब्लू कॉर्नर नोटीस

हसन लोकसभा मतदारसंघातील जनता दल एस चे उमेदवार प्रज्वल रेवन्ना याच्या कथित सेक्स स्कॅडलचे प्रकरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *