Breaking News

अजित पवार यांनी शिवसेनेतील बंडाचा इतिहास सांगत दिला ‘हा’ गर्भित इशारा बंडखोरी करणारा राहतो आणि बाकीचे गायब होतात

शिवसेनेतील नंबरचे दोन नेते एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडाळी काही केल्या क्षमताना दिसत नसल्याचे स्पष्ट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तसेच या बैठकीत आगामी पक्षांच्या ध्येय धोरणाबाबत चर्चा केली. तसेच विद्यमान स्थितीत नेमकी काय भूमिका स्विकारायची आणि कोणती स्विकारायची नाही याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती प्रसारमाध्यमांना देताना शिवसेनेतील बंडाळीचा इतिहास सांगत बंडखोर आमदारांनाही गर्भित इशाराही दिला.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, मी आतापर्यत शिवसेनेतील तीन बंड बघितले. पण शिवसेनेत जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं बंड झालं त्यावेळी नेते एका बाजूला गेले, शिवसैनिक त्यांच्या मागे गेले नाहीत. बंड करणारे एकाबाजूला जातात. मात्र त्यामागून जाणारे इतर आमदार मात्र नंतर गायब होतात निवडणूकांमध्ये पराभूत होतात असा गर्भित इशाराही दिला.

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत सरकारचे प्रमुख म्हणून उध्दव ठाकरेंच्या पाठीशी राहील असा निर्णय घेण्यात आला.

शिवसेनेत जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं बंड झालं त्यावेळी नेते एका बाजूला गेले, शिवसैनिक त्यांच्या मागे गेले नाहीत. मी राजकारणात आल्यानंतर हे शिवसेनेतील तिसरं बंड आहे. मी छगन भुजबळ, नारायण राणे यांचं बंड पाहिलं. आणि आता एकनाथ शिंदे यांचे हे तिसरं बंड. हे सर्व पाहिलं तर बंड करणारी प्रमुख व्यक्ती टिकते, पण नंतर इतर सहकारी निवडूनही येऊ शकत नाहीत इतकं शिवसैनिक कष्ट घेतात. शिवसैनिक त्यांचा पराभव करण्यासाठी जीवाचं रान करतात असा मागील अनुभव आहे. याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

यावेळी अजित पवारांसमोर राज ठाकरेंच्या बंडाचा उल्लेख केला असता ते त्यांच्या घरातील प्रकरण होतं असं ते म्हणाले. दरम्यान यावेळी अजित पवारांना हा शिवसेनेचा महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा डाव आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, मी अडीच वर्ष उद्धव ठाकरेंसोबत जे काम केलं आहे, ते पाहता त्यांचा स्वभाव नाही. ते मोकळेपणाने मला असं करायचं आहे सांगतात असे स्पष्ट करत या बंडामागे स्वत: उध्दव ठाकरे नसल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही आघाडीला पाठिंबा दिला आहे. आम्ही पाठिंबा काढणार नाही. मुख्यमंत्रीपदालाही पाठिंबा दिला असून शेवटपर्यंत साथ देणार आहोत असेही ते म्हणाले.

आमदार, मंत्री, नेते ज्यांना सुरक्षा आहे ते जेव्हा जातात तेव्हा त्यांना सुरक्षा देणारे काय करतात याकडे लक्ष देण्याची गरज गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यावर आहे. ते काय करत होते ही विचार करण्याची गोष्ट आहे असे सांगत अप्रत्यक्ष गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कार्यपध्दतीबाबत त्यांनी अप्रत्यक्ष भाष्य केले.

काही आमच्यातील मित्रपक्ष थोडे वेगळ्या प्रकारचे वक्तव्य करत आहेत. अजित पवारांनी निधीचा वापर केल्याचे बोलले जात आहे. मला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगायचं आहे की, सरकार अडीच वर्षापूर्वी अस्तित्वात आले, त्यावेळी ३६ पालकमंत्री हे एक तृतीयांश काँग्रेस, एक तृतीयांश शिवसेना आणि एक तृतीयांश राष्ट्रवादीचे नेमले. त्यांना निधी देताना कुठेही काटछाट केली नाही. अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला निधी देण्यात आला आहे. पण त्यांनी तशा पद्धतीने वक्तव्य का केले मला माहिती नाही. मी कधीही दुजाभाव केला नाही. सगळ्यांना विकासकामांमध्ये मदत करण्याची भूमिका माझी असते हे आपण पण पाहिले आहे. चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचे काम मी करत असतो. माध्यमांसमोर बोलण्यापेक्षा सर्व मंत्री समोर असताना सांगितले असते तर तिथल्या तिथे गैरसमज दूर झाले असते असे प्रत्युत्तरही त्यांना नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांना नाव घेतला दिले.

अशा काळामध्ये तिघांनी पण आघाडी कशी टिकेल आणि ही परिस्थिती कशी हाताळता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे असा टोलाही त्यांनी काँग्रेसचे नाव न घेता लगावला.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *