Breaking News

शरद पवार म्हणाले; शिंदे-फडणवीस सरकारमध्ये असंतुष्टच, कधीही कोसळेल मध्यावधी निवडणुकांची शक्यता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधानसभेचा पाया मजबूत करा

राज्यातील शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारत बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी वेगळी चुल मांडत भाजपाच्या मदतीने राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. तसेच उद्या सोमवारी ४ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार बहुमत चाचणीलाही सामोरे जाणार आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार आणि नेत्यांची बैठक घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये असंतुष्टांची मांदियाळी मोठ्या प्रमाणावर असून हे सरकार आगामी ६ महिन्यात कोसळेल असे भाकित करत सर्व आमदारांना मध्यावधीची तयारी करण्याचे आदेश दिले.

येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका ओबीसी आरक्षणासहच व्हायला हव्यात यासाठी प्रयत्न करा. राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे. तेव्हा येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधानसभेचा पाया मजबुत करा, असे आदेशही त्यांनी यावेळी आमदारांना दिले.

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदारांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आज पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले. या बैठकीला विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रफुल पटेल, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार रामराजे नाईक निंबाळकर, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आणि विधानसभेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

याविषयीची माहिती राष्ट्रवादीचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी दिली. ते म्हणाले, दोन महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर लोकांत जा, महाविकास आघाडीने केलेली कामे त्यांच्यापर्यंत पोहोचवा, या निवडणुका म्हणजे लोकसभा, विधानसभा निवडणुकांचा पाया आहे. तेव्हा जोरदार तयारी करा, असे निर्देश शरद पवार यांनी दिले आहेत.
महाविकास आघाडीने नेमलेल्या समितीने इम्पेरिकल डेटासंदर्भातील काम पूर्ण केले आहे. याचा अहवाल लवकरच सादर केला जाईल. मतदार यादी समोर ठेवून माहिती गोळा करण्यात आली असून बांठिया आयोगाकडे याचा सर्व तपशील देण्यात आला आहे. अंतिम टप्प्यात हे काम आले असून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे काम पहात असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती विश्वनीय सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील, हसन मुश्रीफ, अजित पवार, धनंजय मुंडे यांची बैठक झाली. यामध्ये अजित पवार यांच्या नावावर एकमत झाल्याचे समजतेय. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांची शरद पवार यांच्यासोबतची बैठक काही वेळापूर्वी संपली. आमदारांकडून बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आलाय. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *