Breaking News

विश्वासदर्शक ठराव शिंदे-फडणवीस सरकारने जिंकला: मविआला १०० ही अशक्य उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले अदृष्य “हाता”च्या मदतीचे आभार

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मांडलेला विश्वास दर्शक ठराव १६४ मतांनी आज जिंकत आपलेच सरकार आणि आपलीच शिवसेना असल्याचे एकप्रकारे सिध्द करून दाखवून दिले. तर १७० जणांचा पाठिंबा राहिलेल्या महाविकास आघाडीला १०० रीही गाठता आली नाही.  विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बहुमत चाचणीसाठीचा ठराव सभागृहात मांडला. तर त्यास शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांनी अनुमोदन दिले.

त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बहुमत चाचणीचा प्रस्ताव मतदानास टाकला. सुरुवातीला सत्ताधारी बाकावरील सदस्यांची मोजणी झाल्यानंतर १६४ जणांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिल्याचे दिसून आले. सत्ताधारी बाकावरील मोजणी झाल्यानंतर महाविकास आघाडीतील सदस्यांची मतमोजणी सुरु झाली असता महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि इतर काही जण गैरहजर असल्याचे लक्षात आले. अखेर सभागृहात उपस्थित असलेल्यांनी मतदानात सहभाग घेतला. आणि मतांची संख्या भरली ९९. त्यामुळे महाविकास आघाडीला पराभूत होतानाही मानहानीला सामोरे जावे लागले.

याच मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्तावाचं भाषण करताना काँग्रेसच्या काही आमदारांनी अप्रत्यक्षपणे या अविश्वास ठरावाला पाठिंबा दिल्याचा इशारा करत या बाहेरुन मदत केलेल्या ‘हातां’चे आभार मानले.

शिंदे यांच्या विजयानंतर सभागृहामध्ये बोलाताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला. यावेळी फडणवीस यांनी शिंदे यांचा उल्लेख करताना ‘शिवसेना भाजपा युतीचे मुख्यमंत्री’ असा केलाय. यानंतर भाजपा आणि शिंदे गटाच्या आमदारांनी, ‘शिवसेना भाजपा युतीचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या.

या घोषणाबाजीनंतर फडणवीसांनी पुन्हा आपलं भाषण सुरु केलं. एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला म्हणून शिंदेंचं मनापासून अभिनंदन करतो. ज्या सदस्यांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं त्यांचे अभार तर मानतोच पण ज्या सदस्यांनी अप्रत्यक्षपणे प्रचंड मतांनीनी पारित व्हावा यासाठी बाहेर राहून मदत केली. त्यांचेही आभार मानतो, असं फडणवीस यांनी म्हटलं. त्यानंतर सत्ताधारी आमदारांनी बाकं वाजवून या वक्तव्यावर आनंद व्यक्त केला.

झालं असं की आज अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दीकी, धीरज देशमुख हे नेते विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस सभागृहामध्ये उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना मतदान करता आलं नाही. या आमदारांबरोबरच प्रणिती शिंदे, जितेश अंतापुरकर काल ही अनुपस्थित होते आज ही अनुपस्थित होते. याच सर्वांना उद्देशून फडणवीसांनी ‘बाहेर राहून मदत केली’ असं म्हटले.

सभागृह ११ वाजता सुरु झालं. पण काँग्रेसचे चार सदस्य उशिरा आले. सभागृहामध्ये प्रवेश देण्याची वेळ संपल्याने अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दीकी, धीरज देशमुख यांना विश्वासदर्शक ठरावासाठी सभागृहात प्रवेश देण्यात आला नाही. तर जितेश अंतापूरकर यांचे लग्न असल्याने ते अनुपस्थित होते. त्याचप्रमाणे प्रणिती शिंदे या परदेशी असल्याने त्या सभागृहात आल्या नाहीत. हे सहा आमदार अनुपस्थित असल्याने विरोधकांची विश्वासदर्शक ठरावाची आकडेवारी ९९ पर्यंतच पोहोचली.

Check Also

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *