Breaking News

सत्यजीत तांबेच्या उमेदवारीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट, मी आधीच सांगितले होते… बाळासाहेब थोरात यांच्याशी मी आधीच बोललो होतो

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेस पक्षांतर्गत असलेला बेबनाव पुन्हा एकदा समोर आला. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिलेली असूनही त्यांनी ऐनवेळी आपला अर्जच दाखल केला नाही. तर मूळचे काँग्रेसचे नेते असलेले सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला. त्यातच सत्यजीत तांबे यांना भाजपाने पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. या सगळ्या पार्श्वभूमीवर सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, नाशिक पदवीधर मतदारसंघात काहीतरी वेगळं शिजतय असे मी अगोदरच बाळासाहेब थोरात यांना सांगितले होते असे विधान करत गौप्यस्फोट केला.

सत्यजित तांबे हे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. परिणामी काँग्रेस तसेच बाळासाहेब थोरात चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

यावेळी पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, दोन दिवसांपासून काहीतरी वेगळेच कानावर येत होते. त्यामुळे मी स्वत: बाळासाहेब थोरात यांच्याशी बोललो. काहीतरी वेगळं शिजत आहे, माझ्या कानावर आले आहे. तुम्ही काळजी घ्या, असे मी त्यांना सांगितले होते. मी बाळासाहेब थोरात यांना आदल्या दिवशी पूर्णपणे सांगितले होते. मात्र बाळासाहेब थोरात यांनी तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही आमच्या पक्षाची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडू. डॉ. सुधीर तांबे यांचाच अर्ज दाखल होईल, असे मला सांगितले होते, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

नाशिक पदवीधर मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी सोडण्यात आला होता. या जागेवर काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र अर्ज दाखल करावयाच्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी पक्षाचा ए बी फॉर्म असूनही डॉ. सुधीर तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखलच केला नाही. त्याऐवजी सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला. या जागेवर सत्यजित तांबे यांचा विजय झाला तरी ते अपक्षच आमदार असतील. त्यामुळे काँग्रेसने निवडणुकीआधीच ही जागा गमावली असल्याचे बोलले जात आहे.

Check Also

अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी यांचा इशारा, चित्रा वाघ यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा…

मी एक चारित्र्यवान कलावंत आहे आणि एका कलावंताचा अपमान केला म्हणून भाजपा नेता चित्रा वाघ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *