Breaking News

विधानसभेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव संमत द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सबलीकरणाचा गौरव - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भारताने नेहमीच महिला सबलीकरणासाठी पहिले पाऊल टाकून जगासमोर आदर्श ठेवला आहे. याच परंपरेचा गौरव आणि अभिमान म्हणून राष्ट्रपतीपदी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड ओळखली जाईल. आदिवासी समाजातून येऊनही उच्च शिक्षित आणि समाजकारणात अग्रभागी राहिलेले नेतृत्व म्हणून श्रीमती मुर्मू यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीने आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आणि त्यातील विविध घटकांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्याच्या प्रक्रियेला मोठा हातभार लागणार आहे. असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी आणि जगदीप धनखड यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला.

विधीमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे अभिनंदन प्रस्तावावर भाषण करताना म्हणाले, अतिशय विपरीत परिस्थितीत संघर्ष करीत राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेल्या श्रीमती द्रौपदी मुर्मू या आम्हा सर्वांसाठी आदर्श आहेत. त्यांचा जीवन संघर्ष आणि संकटांवर मात करण्याची इच्छाशक्ती ही आज अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यावर त्या मुंबईला आल्या होत्या तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटलो. नंतर त्यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्याची संधीही मिळाली. त्या राष्ट्रपती होणार होत्या, पण कमालीची विनम्रता, आणि आपण ज्या समाजातून आलो आहोत, त्यांचं देणं असल्याची भावना त्यांच्यात असलेली पाहून मी भारावून गेलो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, खरोखरच देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून त्यांचा कार्यकाळ अभिमानास्पद ठरेल यात तीळमात्र शंका नाही. मला महिला आणि पुरुष असा भेद करायचा नाही, तुलनाही करायची नाही. २१ व्या शतकात झेप घेणारा आपला देश आहे. आज महिला कोणत्या क्षेत्रात आघाडीवर नाहीत ? सामाजिक, राजकीय, क्रीडा, संशोधन, आरोग्य, शेती, व्यवसाय, लष्कराची तीनही दले, प्रशासन या सर्व क्षेत्रात महिलांनी आपली शक्ती सिद्ध केली आहे. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने तर यावर कळस चढला आहे. भारताची मान अभिमानाने जगात उंचावली आहे. ही आपल्या लोकशाहीची शक्ती आहे असा संदेश जगात गेला आहे.

देशातल्या समस्त गरीब, दुर्बल आणि मागास जनतेला जणू हे सर्वोच्च पद आज मिळालं आहे. श्रीमती मुर्मू यांनी शपथ घेतल्यानंतर आपल्या पहिल्याच भाषणाची सुरुवात ” जोहार” असं म्हणून केली. हा केवळ अभिवादनपर शब्द नाही तर आदिवासी समाजात निसर्गाला धन्यवाद देतानाच तो उल्लेख आहे. निसर्गाला समर्पित भावनेने अतिशय आदराने केलेला तो उल्लेख आहे.

राष्ट्रपतीपदावर असले, तरी माझे पाय मातीचेच आहेत, आणि गोरगरीब आदिवासी आणि त्यांची संस्कृती हीच माझ्यात सामावलेली आहे हे श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी दाखवून दिलं. जगातल्या सर्वात सुंदर अशा निवडक प्रासादात (वास्तूमध्ये ) जिचा समावेश होतो त्या भव्य राष्ट्रपती भवनात आमची आदिवासी कन्या राहते आहे, ही कल्पनाच मुळात अतिशय रोमांचकारी आहे.

देशातील सर्व पक्ष, संघटना, संस्था यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला पण विशेषत: देश विदेशातील बड्या राष्ट्रप्रमुख यांनी त्यांचे अभिनंदन करताना व्यक्त केलेल्या भावना खूप महत्वाच्या वाटतात. मनुष्य त्याच्या परिश्रम आणि मेहनतीने आपल्या जीवनात उंची गाठतो, तो कुठल्या जाती, धर्माचा आहे यावर काही ठरत नाही, हा संदेश सर्वदूर गेला. वैयक्तिक आयुष्यातील संघर्षानंतरही, निस्वार्थ भावनेने समाजाच्या सेवेत, द्रौपदी मुर्मू यांनी स्वत:ला वाहून घेतले, ही बाब तर आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या सकारात्मकतेचे मूर्तीमंत उदाहरण आहे.

श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओरिसा राज्यातील मयुरभंज जिल्ह्यात दापोसी गावात एका आदिवासी कुटुंबात झाला. आदिवासी आणि त्यातही महिला असूनही शिक्षण हेच त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय ठेवले. भुवनेश्वर येथे रमादेवी महिला महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी संपादन केली. विद्युत विभागात कनिष्ठ सहायक म्हणून काम केले. नंतर काही काळ त्या शिक्षिकाही होत्या. याचवेळी त्यांनी आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी काम सुरु केलं.

श्रीमती मुर्मू या १९९७ मध्ये रायरंगपूर नगरपंचायतीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यानंतर २००० व सन २००४ मध्ये त्या रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून ओरिसा विधानसभेवर निर्वाचित झाल्या. त्यांनी ओरिसा सरकारमध्ये वाणिज्य आणि वाहतूक, मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन राज्यमंत्री म्हणूनही उत्तम कामगिरी बजावली. २००७ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून ‘निलकंठ’ पुरस्काराने ओरिसा विधानसभेने गौरविले. त्यानंतर ते २०१५ ते २०२१ या कालावधीत झारखंडचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले. राष्ट्रपतीपदावर श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची झालेली निवड आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद अशीच आहे.
श्रीमती मुर्मू आपल्या पदाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा गौरव वाढवण्यासाठी आणि बलशाली प्रजासत्ताक निर्मितीसाठी महत्वाचे योगदान देतील, हा दृढ विश्वास आहे. त्यांची निवड हा मनामनात प्रखर राष्ट्राभिमान जागृत करणारा क्षण आहे. या निवडीसाठी श्रीमती मुर्मू यांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आदरपूर्वक शुभेच्छा‌.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मांडला

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नवनियुक्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे देखील मी मनापासून अभिनंदन करतो. राजस्थानमधील झुनझुनु जिल्ह्यातील किठाना गावात एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. चित्तौडगड येथील सैनिकी शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भौतिकशास्त्र या विषयात पदवी संपादन केली. नंतर त्यांनी राजस्थान विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली.

धनखड यांनी सुरुवातीस काही काळ राजस्थान उच्च न्यायालयात वकिली केली. सर्वोच्च न्यायालयातही वकिली केली. राजस्थान उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. धनखड यांनी सन १९८९ मध्ये राजकारणात प्रवेश केला. ते १९८९ मध्ये राजस्थानातील झुनझुनु मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. एप्रिल १९९० ते नोव्हेंबर १९९० या कालावधीत त्यांनी केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून उत्तम कार्य केले. त्यांनी १९९३ ते १९९८ या कालावधीत राजस्थानातील अजमेर जिल्ह्यातील किसनगंज विधानसभा मतदारसंघाचेही प्रतिनिधीत्व केले होते. धनखड हे जुलै, २०१९ पासून पश्चिम बंगाल राज्याचे राज्यपाल होते.
अशा या संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव असलेल्या संसदपटूची भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *