Breaking News

शेलारांचा निशाणा, तीन पक्षाचं सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज पीएमआरडीएच्या प्रस्तावित आराखड्यात १ हजार कोटींचा घोटाळा

मावळ: प्रतिनिधी

पीएमआरडीएच्या प्रस्तावित विकास आराखड्यात मावळ मधील शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आरक्षणे टाकून आणि नामधारी शेतकरी “विकासकांची” आरक्षणे निवासी पट्टा म्हणून खुली करण्याचा डाव सुरु असून यात १ हजार कोटींचा घोटाळा करण्यात येतोय, असा गंभीर आरोप भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी मावळ येथे केला.

तसेच राज्यातील तीन पक्षांच सरकार म्हणजे घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाजांचे सरकार असल्याची टीका त्यांनी केली.

कामशेत, मावळ येथे समर्थ बुथ अभियान कार्यकर्ता मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितीत राहून आमदार अँड आशिष शेलार यांनी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, दिगंबर भेगडे, पुणे ग्रामीण अध्यक्ष गणेश भेगडे आदीं उपस्थितीत होते

मावळ तालुक्यातील बूथ प्रमुखांचे चेहरे पाहिल्यावर मावळात कमळ फुलेल, असा विश्वास नक्की वाटतोय. बूथ प्रमुखच भाजपच्या यशाचा मानकरी आहे. देशातील भाजपचे जे प्रमुख नेते आहेत, ते सुध्दा सर्व जण एका बूथचे प्रमुख आहेत, मावळ मधील भाजप कार्यकर्त्याला पोलीस, सरकारी अधिकारी त्रास देत आहेत. असे जिल्हा अध्यक्षांनी भाषणात सांगितले त्यावर आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, पोलीस, शासकीय अधिकाऱ्यांनी

असं करु नये. ते तुमच्या हिताचं नाही. कायदेशीर ही नाही. योग्य नाही, जे बेकायदेशीर काम करत होते, ते गृहमंत्री असले तरी आता वॉन्टेड आहेत. पोलिस अधिकारीही असले तरी वॉन्टेड आहेत, असा खोचक टोला लगावला.

राज्य दलाल चालवत आहेत. अनेक खाती दलालांकडून चालवली जात आहेत हे मी विधानसभेत उघड केले होते. तर गेल्या सात दिवसांपासून आपण पाहतोय की आयकर विभाग काय कारवाया होत आहेत. आता तो माझा भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे असे सूचकपणे त्यांनी लक्षात आणून दिले. तर तीन पक्षांचे सरकारचा उल्लेख करताना त्यांनी हे तीन पक्षाचं सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज आहे अशी टीका केली.

MPSC ची तयारी करणाऱ्या स्वप्निल लोणकरने आत्महत्या केल्यानंतर या विद्यार्थ्याला विधानसभेत ठाकरे सरकारने श्रध्दांजली वाहताना दिलेले आश्वासन सुध्दा पुर्ण करु शकले नाहीत.. ही बाब दुर्दैवी असून सरळ सेवा भरतीसाठी रिक्त पदांची माहितीच सामान्य प्रशासन विभागकडे गोळा झाली नाही. दिलेली मुदत ३० सप्टेंबरला संपली, यावरुन तरुणांच्या विषयात सरकार किती गंभीर आहे हे दिसते, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीतील तीन पक्षात आपसांत रोज लढाई लागलेली आहे. त्यातील दोन पक्षांचे जे संकेत मिळत आहेत. या सर्वांचा अभ्यास केला तर असे अनुमान काढता येईल की, राज्यात कधीही निवडणूक लागू शकतात, त्यामुळे जेव्हा केव्हा निवडणूका लागतील तेव्हा मावळमध्ये भाजपाचा आमदार निवडून आणायचा आहे, अशा तयारीला लागा असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

पीएमआरडीएच्या प्रस्तावित विकास आराखड्यात मावळ मधील शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आरक्षणे टाकून आणि नामधारी शेतकरी “विकासकांची” आरक्षणे निवासी पट्टा म्हणून खुली करण्याचा डाव सुरु असून या १ हजार कोटींचा घोटाळा करण्यात येतोय. शेतजमिनी, शेतघरे याची आरक्षणे बदलून शेतकऱ्यांना मारक ठरतील आणि अल्पभूधारक शेतकरी उध्वस्त होईल अशी आरक्षणे टाकली जात आहेत. एका शेतकरी परिवाराची अंदाजे १ हजार एकर शेतजमीन निवासी म्हणून कशी खुली करण्यात आली?  हा सगळा दहा हजार कोटीचा मामला आहे. या आराखड्यात १ हजार कोटीचा घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *