Breaking News

तुम्हाला माहित आहे का? गौतम अदानींच्या संपत्तीत रोज कितीने वाढ होते १ हजार कोटींची वाढ, पुन्हा बनले आशियातील दुसरे श्रीमंत

मुंबई : प्रतिनिधी

अदानी समूहाचे मालक गौतम अदानी हे आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. सध्या त्यांची संपत्ती ५.०५ लाख कोटी रुपये आहे. एक वर्षापूर्वी त्यांची संपत्ती १.४० लाख कोटी रुपये होती. म्हणजेच गेल्या एका वर्षात त्यांची संपत्ती ३.६५ लाख कोटी रुपयांनी वाढली. ह्या एका वर्षात त्यांची संपत्ती दररोज १००२ कोटी रुपयांनी वाढली आहे.

मुकेश अंबानी यांचे कुटुंब भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. गेल्या एक वर्षात त्याच्या संपत्तीत दररोज १६३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजे एका वर्षात त्यांच्या संपत्तीत ९ टक्के वाढ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती ७.१८ लाख कोटी रुपये आहे. अंबानींच्या तुलनेत गेल्या वर्षभरात अदानींची संपत्ती दररोज ६ पटीने वाढली.

IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२१ नुसार, गौतम अदानीची संपत्ती एका वर्षात जवळपास ४ पट वाढली आहे. याच कारणामुळे ५९ वर्षीय अदानी पुन्हा आशियातील दुसरे श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. या वर्षी मे महिन्यात ते आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले. मात्र, त्याच्या कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांच्या बातम्यांमुळे जूनमध्ये त्यांच्या कंपन्यांचे शेअर्स प्रचंड घसरले होते. अदानीची वैयक्तिक संपत्ती देखील यामुळे कमी झाली.

अदानीच्या शेअरच्या किंमती गेल्या काही काळापासून वाढू लागल्या आहेत. अदानींनी आतापर्यंत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोंग शानशानला मागे टाकले आहे. गौतम अदानी आणि त्यांचा दुबईस्थित भाऊ विनोद अदानी या दोघांनी आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये एकत्र पहिल्या १० मध्ये स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांचा भाऊ आशियातील ८ वा श्रीमंत उद्योगपती आहे. तो आधी १२ व्या क्रमांकावर होता.

विनोद अदानी यांची संपत्ती १.३१ लाख कोटी आहे. त्यांची संपत्ती एका वर्षात २१ टक्के वाढली आहे. आयटी कंपनी एचसीएल टेकची शिव नादर आणि त्याच्या कुटुंबाची संपत्ती एका वर्षात ६७ टक्के वाढली. त्यांची एकूण संपत्ती २.३६ लाख कोटी रुपये आहे. श्रीमंतांमध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर हिंदुजा कुटुंबाची संपत्ती २.३० लाख कोटी रुपये आहे. त्यांच्या संपत्तीत ५३ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

आर्सेलर मित्तलचे मालक लक्ष्मी मित्तल आशियाई श्रीमंतांच्या यादीत ५ व्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती १.७४ लाख कोटी रुपये आहे. त्यांची संपत्ती दररोज ३१२ कोटींनी वाढली. अहवालानुसार, सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला १.६३ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या संपत्तीमध्ये दररोज १९० कोटी रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. त्याच्या संपत्तीत एकूण ७४ टक्के वाढ झाली आहे. डी मार्टचे राधाकृष्ण दमाणी ७ व्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती १.५४ लाख कोटी रुपये आहे.

बिर्ला समूहाचे कुमार मंगलम बिर्ला ९ व्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती १.२२ लाख कोटी रुपये आहे. आशियातील पहिल्या १० श्रीमंतांपैकी तीन मुंबईत, दोन लंडनमध्ये, एक अहमदाबाद, एक दिल्लीत आणि एक पुण्यात राहतो.

Check Also

एचडीएफसीही आणणार दिर्घकालीन बॉण्ड ६० हजार कोटी रूपयांचे रोखे जारी करण्यास बोर्डाची मान्यता

एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने शनिवारी खाजगी प्लेसमेंट मोडद्वारे पुढील बारा महिन्यांत एकूण ₹६०,००० कोटी रुपयांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *