Breaking News

शरद पवारांचा गौप्यस्फोट, सरकार स्थापनेसाठी मोदींसोबत चर्चा झालेली पण अजित पवारांना पाठविले नव्हते

मराठी ई-बातम्या टीम

राज्यात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीच्यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा आघाडीचे सरकार स्थापन करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाली होती असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज केला.

इंडियन इक्सप्रेस ग्रुपच्या मराठी वर्तमानपत्र संस्थेकडून शरद पवार यांच्यावरील अष्टावधानी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान शरद पवारांनी वरील गौप्यस्फोट केला.

हे खरं आहे की माझी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि भाजपाने एकत्र येण्याबाबत चर्चा झाली. मोदींची तशी इच्छा होती, पण मी स्वतः त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना सांगितलं की, हे शक्य होणार नाही, आम्हाला तुम्हाला अंधारात ठेवायचं नाही, आपली भूमिका वेगळी आहे. यावर त्यांनी अजूनही विचार करा असं सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

परंतु २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मीच अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस आणि भाजपासोबत पाठवले अशी चर्चा होती. पण मी त्यांना पाठवलं असते तर त्यांनी राज्यच बनवलं असते. त्यांनी अर्धवट काही काम केलं नसते. मी अजित पवार यांना पाठवलं होते यात काहीच अर्थ नसल्याचे त्यांनी सांगितले.

तेव्हा स्पष्ट बहुमत कुणाकडेच नव्हतं. आघाडी म्हणून बघितलं तर सेना-भाजपाकडे बहुमत होते. मात्र, सेना आणि भाजपा एकत्र राहणार नाही हे आम्हाला दिसले. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला आत्ता जे सत्तेत येऊ पाहत आहेत त्यांना बाजूला करायचे असेल तर त्यांना सोयीची भूमिका घेणे शक्य नाही. म्हणून पहिल्यांदा निवडणूक झाल्यावर मी दिल्लीत एक वक्तव्य केलं, देवेंद्र फडणवीस यांना बहुमतासाठी काही लोकांची कमतरता असेल तर आम्ही त्याचा गांभीर्याने विचार करू. माझं ते एक वक्तव्य सेना-भाजपातील अंतर वाढायला फार उपयोगी पडल्याची कबुलीही त्यांनी यावेळी दिली.

साधी गोष्ट आहे की ते दोघे एकत्र यावं असा प्रयत्न आम्ही केला असता, तर आम्ही पुन्हा ५ वर्षे सत्तेबाहेर राहिलो असतो. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे हे दिसत होते आणि ते तातडीने मुख्यमंत्रीपद हवंय म्हणत होते. त्यामुळे तेव्हा तात्पुरतं त्यांना पोषक वक्तव्य केल्याने नुकसान होणार नव्हते. माझ्या या एका वक्तव्यामुळे सेनेत अस्वस्थता निर्माण झाली आणि फडणवीसांकडून असं काही सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे ते आमच्यासोबत आल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुकीनंतर दीड महिने सरकार स्थापन झालं नव्हते. त्यामुळे सेना-भाजपात खूप अंतर वाढलं होते. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात स्थिर सरकार आणण्यासाठी राष्ट्रवादीची गरज वाटली असेल, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अंतर्गत जेव्हा बैठका झाल्या तेव्हा या दोन्ही पक्षांच्या काही सहकाऱ्यांमध्ये कटुता वाढली होती. त्यामुळे या परिस्थितीचा फायदा घेणं शक्य आहे हा विचार भाजपाच्या नेतृत्वाच्या मनात असू शकतो. त्यामुळे त्यांनी चाचपून पाहिलं असावं असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *