Breaking News

उध्दव ठाकरेंचे नाव न घेता फडणवीस म्हणाले, त्या स्थगितीमुळे १० हजार कोटी वाढले मुंबई मेट्रो मार्गिका-३ च्या सुधारित प्रस्तावास मान्यता

बहुचर्चित कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो मार्गासाठी आरे येथे कारशेड उभे करण्याच्या कामास तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्थगिती दिली. मात्र सत्तांतरानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांचा तो निर्णय रद्दबातल करत आरे येथेच कारशेड करण्याचे आदेश जारी केले. यासंदर्भात आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मेट्रोच्या या प्रकल्पाच्या सुधारीत १० हजार कोटी रूपयांच्या वाढीव खर्चास मान्यता दिली.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, २३ हजार कोटी रूपयांचा असलेला मेट्रो-३ प्रकल्प हा आता ३३ हजार कोटींचा झाला आहे. ही १० हजार कोटींची वाढ त्या स्थगितीमुळे वाढलेली असल्याचे सांगितले. मात्र यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव जाणीवपूर्वक घेण्याचे टाळले. मात्र अप्रत्यक्ष या खर्च वाढीला उध्दव ठाकरेच जबाबदार असल्याचे फडणवीस यांनी सूचित केले.

कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-३ प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या प्रकल्पाचा मूळ खर्च २३ हजार १३६ कोटी होता तो आता ३३ हजार ४०५ कोटी ८२ लाख रुपयांचा होईल. प्रकल्पाच्या वाढीव खर्चात केंद्र शासनाचा सहभाग मिळण्याकरिता देखील केंद्र शासनास विनंती करण्यात येत आहे.

सुधारित आराखड्यानुसार राज्य शासनाच्या हिश्याची रक्कम २ हजार ४०२ कोटी ७ लाख वरुन ३ हजार ६९९ कोटी ८१ लाख एवढी होत आहे. त्यामुळे राज्याच्या समभागापोटी १ हजार २९७ कोटी ७४ लाख अशी वाढीव रक्कम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई मेट्रो रेलला देण्यासंदर्भात प्राधिकरणाला निर्देश देण्यात आलेले आहेत.

या सुधारित वित्तीय आराखडयानुसार जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेचे (जायका) कर्ज १३ हजार २३५ कोटीवरुन १९ हजार ९२४ कोटी ३४ लाख इतके झाले असून वाढीव रक्कमेचे कर्ज घेण्यास देखील मान्यता देण्यात आली.

मुंबई मेट्रो मार्ग -३ ची एकूण लांबी ३३.५ किमी असून हा मार्ग संपूर्ण भुयारी आहे. या मार्गात २६ भुयारी आणि एक जमिनीवरील अशी २७ स्थानकं असून वर्ष २०३१ पर्यंत १७ लाख प्रवासी प्रतिदिन प्रवास करतील असा अंदाज आहे. ही मार्गिका सुरु झाल्यानंतर नरिमन पाँईट, वरळी, वांद्रे कुर्ला संकुल व आंतरराष्ट्रीय व आंतरराज्य विमानतळ, मरोळ औद्योगिक वसाहत, सीप्झ अशी महत्वाची केंद्र मेट्रोने जोडली जातील. कुलाबा ते आंतरराष्ट्रीय विमानतळ ५० मिनिटात करणे सहज शक्य होणार आहे.

सध्या बोगद्यांचे ९८.६ टक्के एवढे काम झाले असून भूमिगत स्थानकांचे सुमारे ८२.६ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी ७३.१४ हेक्टर शासकीय जमिन व २.५६ हेक्टर खासगी जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे.

Check Also

मैदानाची परवानगी बच्चू कडू यांच्याकडे मात्र अमित शाह यांची सभा नवनीत राणांसाठी

सध्याच्या लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने प्रचाराची रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. या त्यातच अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *