Breaking News

संजय राऊत यांचा टोला; २०० जागांची भाषा दिल्लीतील नेत्यांची, राज्यातील नव्हे आमदार संतोष बांगर यांच्या शिंदे गटात जाण्यावर केले भाष्य

गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांना परत आणण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यासमोर सातत्याने भूमिका मांडणाऱ्या आमदाराने विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत शिवसेनेला मोठा झटका दिला. यापार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटात गेलेल्या शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला. जे आमदार आदल्या दिवशी आपल्या मतदारसंघात जाऊन रडत होते ते शिवसेना सोडून गेले तेव्हा आश्चर्य वाटलं. मात्र, अशा लोकांना जनता व मतदार पुन्हा उभं करणार नसल्याचा दावा केला.

मंगळवारी ५ जुलै रोजी मुंबईत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत हे पत्रकार परिषदेत बोलत होते.

काल तर एक आमदार गेले त्यामुळे आश्चर्यच वाटलं. आदल्या दिवशी हेच आमदार त्यांच्या मतदारसंघात जाऊन रडत होते. हिंगोलीत लोकांनी त्यांचं स्वागत केलं होतं. एक निष्ठावान म्हणून त्यांच्या डोळ्यात अश्रुधारा वाहू लागल्या होत्या. अशा लोकांकडून काय अपेक्षा करणार? अशा लोकांना जनता व मतदार पुन्हा उभं करणार नाही, असं मी खात्रीने सांगतो. २०० जागांची भाषा राज्यातील नेते करत नाहीत, तर दिल्लीतील नेते करत आहेत असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे नाव न घेता लगावला.

शिवसेना पक्षप्रमुखांनी म्हटलं आहे, तुम्ही आज मध्यावधी निवडणुका घ्या. आम्ही लढायला तयार आहोत. तुम्ही तयार आहात का? जनतेच्या न्यायालयात जाऊ. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आता निवडणुका झाल्या तर शिवसेनेचे १०० हून अधिक आमदार निवडून येतील. आमच्यात हिंमत आहे. कारण आम्हाला माहिती आहे आम्ही खरे आहोत. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे असेही ते म्हणाले.

पैशांच्या आणि दिल्लीतील केंद्रीय तपास संस्थांच्या बळावर तुम्ही देशातील कोणत्याही पक्षाला हायजॅक करू शकत नाही. ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे की या आमदारांना केवळ पैसेच नाही, तर आणखी काही मिळालं आहे. या आणखी काहीमध्ये मोठं रहस्य आहे. ते लवकरच समोर येईल असेही ते म्हणाले.

शिंदे गटाकडून आलेल्या नोटीसवर संजय राऊत म्हणाले, ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे त्यांना नोटीस देऊ द्या. आदित्य ठाकरे यांना सोडून का नोटीस दिल्या हे मला माहिती नाही. जे म्हणतात बाळासाहेब ठाकरे यांचा आदर असल्याने आदित्य ठाकरे यांना नोटीस दिली नाही .त्यांनी लक्षात ठेवावं जे इतर १४ आमदार आहेत. तेही बाळासाहेब ठाकरे यांचेच शिवसैनिक आहेत असेही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार गुवाहाटी येथे मुक्कामी गेल्यानंतर संतोष बांगर यांनी या सर्व आमदारांना परत येण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन करताना त्यांना अश्रूदेखील अनावर झाले होते. मात्र हेच बांगर आता शिंदे गटात सामील झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

संतोष बांगर गटात कसे आले याचा किस्सा सांगितला एकनाथ शिंदेंनी

बांगर यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न प्रत्येकालाच पडला होता. याबद्दल आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच भर विधानसभेत किस्सा सांगितला. संतोष बांगर शिंदे गटात कसे आले? संतोष बांगर यांना मी बोलवलं नाही. त्यांनी मला फोन केला होता. मला कसं बोलावं म्हणून ते घाबरत होते. पण त्यांनी रात्री दीड वाजता फोन केला. मला यायचं आहे, माझी चूक झाली आहे. आणखी तीन ते चार लोक आहेत, त्यांचही मत असंच आहे, असं बांगर यांनी मला सांगितलं. नंतर मी बांगर यांना सांगितलं की, आपल्याला खोटं काहीही करायचं नाही, असे एकनाथ शिंदे आपल्या भाषणा दरम्यान म्हणाले.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *