Breaking News

भास्कर जाधवांनी केली नरेंद्र मोदींची नक्कल आणि झाली खंडाजंगी फडणवीसांनी केली निलंबनाची मागणी- अखेर माफी नाम्यानंतर प्रकरण क्षमले

मराठी ई-बातम्या टीम
‘विदेशातून काळा पैसा देशात आणून नागरीकांच्या बँक खात्यात १५ लाख रूपये जमा केले जातील, या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारातील कथित वक्तव्याची शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी नक्कल करत त्या अनुषंगाने अंगविक्षेप केल्याने आक्रमक झालेल्या विरोधी सदस्यांनी विधानसभेत प्रचंड गदारोळ केला. पंतप्रधान मोदीची अंगविक्षेप नक्कल करणाऱ्या जाधव यांनी माफी मागावी आणि त्यांचे निलंबन करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लावून धरली. विरोधीपक्ष भाजपाच्या सदस्यांनी वेलमध्ये येऊन घोषणा दिल्या. यावरून सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले.
अखेर, पंतप्रधानपदाचा अवमान करण्याचा माझा विचार नव्हता. मी असंसदीय शब्द वापरले नाहीत. पण माझ्याकडून चूक झाली असेल तर माफी मागतो, असे भास्कर जाधव यांनी सांगितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.
बुधवारी विधानसभेत राज्यातील वीज ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिल आणि विजेची कनेक्शन तोडली जात असल्याबद्दल लक्षवेधी सूचनेवर ऊर्जामंत्री नितीन राऊत हे उत्तर देत होते. १०० युनिट पर्यंत वीज माफ करण्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. त्याची आठवण भाजपाचे सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी करून दिली. त्यावर १०० युनिट पर्यंत वीज माफ करण्याचे माझे व्हिजन होते. पण कोरोना संकटामुळे ते शक्य झाले नाही. पण नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत काळा पैसा आणून नागरिकांना १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, असे वक्तव्य केले. तोच धागा पकडून भास्कर जाधव यांनी, पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची नक्कल केली. याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार आक्षेप घेतला.
पंतप्रधान मोदी यांनी असे वक्तव्य कधीही केलेले नाही. पण त्यापेक्षा जाधव यांनी अंगविक्षेप करत पंतप्रधान मोदी यांचा अवमान केला आहे. याबाबत जाधव यांना निलंबित करा. त्यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली. त्यांच्या या मागणीवेळी भाजपाचे सर्व सदस्यही त्यांच्यामागे येवून उभे रहात फडणवीसांच्या सुरात सुर मिसळला.
त्यावर जाधव यांचे वक्तव्य तपासून बघावे. त्यानंतर योग्य ती कारवाई करावी, असे संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी सांगितले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी जाधव यांचे वक्तव्य तपासून घेतो, असे सांगितले. पण त्यावर भाजपाच्या सदस्यांचे समाधान झाले नाही. तुमच्या नेत्यांची नक्कल केली तर चालेल का, असा सवाल फडणवीस यांनी केला. २०१४ च्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची मी नक्कल केली, असे जाधव सांगू लागले. तेव्हा भाजपाच्या सदस्यांनी वेलमध्ये येऊन घोषणा दिल्या. माफी मागितल्या शिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असे फडणवीस म्हणाले.
आपण वक्तव्य आणि अंगविक्षेप मागे घेतो, असे जाधव यांनी सांगितले. तोच मुद्दा पकडून जाधव यांनी अंगविक्षेप केल्याची कबुली दिली. अंगविक्षेप मागे घेता येत नाही. माफी मागा, अशी मागणी फडणवीस यांनी केली. यावरून सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. अखेर, पंतप्रधानपदाचा अवमान करण्याचा माझा विचार नव्हता. मी असंसदीय शब्द वापरले नाहीत. पण माझ्याकडून चूक झाली असेल तर माफी मागतो, असे भास्कर जाधव यांनी सांगितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

Check Also

आणि वडेट्टीवारांनी उडविली पडळकरांची खिल्ली, “नया नया पंछी ज्यादा फडफड…” वडेट्टीवार पडळकरांचा ओबीसीवरून नवा वाद

मराठी ई-बातम्या टीम ओबीसी आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयात उद्या सोमवारी सुणावनी असून या पार्श्वभूमीवर ओसीबी समाजाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *