Breaking News

चंद्रपुरात पंतप्रधान मोदी म्हणाले,… लीगच्या भाषेला देश स्विकारणार का?

देशातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीचे वातावरण उन्हाबरोबर चांगलेच वाढताना दिसून आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान पार पडत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाचे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिरसभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर टीकास्तर सोडत केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना सातत्याने महाराष्ट्रावर अन्याय करण्यात येत होता. इथल्या विकास कामांना निधी देण्यात येत नव्हता. परंतु केंद्रात जेव्हापासून भाजपाचे सरकार आलेले आहे तेव्हापासून महाराष्ट्राच्या विकासावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. तसेच सभेला जमलेल्या या जनसमुदायाला पाहुन वाटते की महाराष्ट्राने भाजपाला ४०० पार इतक्या जागा देण्याचा निर्णय घेतला असल्याचा पण केल्याचे दिसून येत आहे.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसने जो जाहिरनामा जाहिर केला आहे. त्यात सरळसरळ मुस्लिम लीगची भाषा वापरण्यात आलेली आहे. काँग्रेसला आता गेलेली सत्ता परत मिळविण्यासाठी झोडा आणि फोडा या प्रणालीचा वापर करून त्यांना सत्ता मिळवायची आहे. त्यामुळेच ते मुस्लिम लीगची भाषा वापरत आहेत असा आरोपही यावेळी करत अशा पध्दतीची भाषा वापरणाऱ्या काँग्रेसला देश स्विकारणार का असा सवालही यावेळी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, देशात पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनीच काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. तसेच ३७० कलमाचा उल्लेखही केला होता. याशिवाय काँग्रेसच्या धोरणावर सातत्याने टीका केली होती. परंतु तरीही शिवसेनेने काँग्रेस पक्षासोबत युती केली. सध्या काँग्रेससोबत जी शिवसेना आहे ती नकली शिवसेना असल्याचा उपरोधिक टोलाही यावेळी उद्धव ठाकरे यांना लगावला.

यावेळी पतंप्रधान मोदी म्हणाले, चंद्रपुरात उन्हाचा पारा वाढतो आहे, तसंच राजकीय वातावरणही तापू लागलं आहे. परंतु, तुमचा (नागरिक) जोश, उत्साह अजिबात कमी झालेला नाही. या वेळी चंद्रपूरने ठरवलं आहे ‘फिर एक बार ४०० पार’… याच चंद्रपूरने राम मंदिराच्या निर्मितीसाठी आणि संसदेच्या नवीन इमारतीसाठी लाकडं पाठवली आहेत हे आम्ही विसरलो नसल्याची आठवणही यावेळी चंद्रपूरच्या जनतेला सांगितले.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशात एका बाजूला भाजपाप्रणित एनडीएचं सरकार आहे, ज्यांना केवळ देशासाठी कठोर आणि भक्कम निर्णय घ्यायचे आहेत. दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि इंडी आघाडी आहे, ज्यांचा एकच मंत्र आहे, जिथे सत्ता मिळेल तिथली मलाई खाऊन टाकणे… इंडी आघाडीने देशाला नेहमीच अस्थिर ठेवलं आहे. एक स्थिर सरकार का आणि किती गरजेचं असतं ते या महाराष्ट्राशिवाय दुसऱ्या कोणाला कळणार? असे प्रतिपादनही यावेळी केले.

काँग्रेसवर टीका करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, मराठीत एक म्हण आहे, कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले तरी ते कडूच राहतं. तुम्ही त्याला काहीही करा त्याचा कडवटपणा जाणार नाही. ही म्हण काँग्रेसला तंतोतंत लागू पडते. कारण काँग्रेसवाले कधीच सुधारणार नाहीत. ते कधीच बदलणार नाहीत. त्यांनी आतापर्यंत जी कूकर्मं केली आहेत त्यामुळे त्यांनी देशातला जनाधार गमावला आहे अशी टीकाही यावेळी केली.

पंतप्रधान मोदी शेवटी म्हणाले, इंडी आघाडीचे खासदार भारताचा आणखी एक तुकडा पाडण्याच्या गोष्टी करत आहेत. दक्षिण भारताला आपल्या देशापासून तोडून वेगळा देश बनवण्याच्या गोष्टी करत आहेत. स्टलिन यांचा द्रमुक पक्ष सनातन धर्मावर टीका करतो. सनातन धर्माची डेंग्यू, मलेरियासारख्या आजाराशी तुलना केली जाते, दुसऱ्या बाजूला काँग्रेसवाले बनावट शिवसेनेबरोबर मोर्चे काढतायत अशी टीकाही यावेळी केली.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसात सहा सभा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत २९ व ३० एप्रिल रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *