Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका भटकती आत्मा…शरद पवार म्हणाले, ते खरंय

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराबरोबरच, बारामती आणि शिरूर मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील विरोधकांवर टीका करताना काही नेत्यांचे नाव न घेता काही भटकती आत्मा असल्याची टीका केली. तसेच या भटकती आत्मा असलेल्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले तरी त्यांचा आत्मा शांत होण्याचे नाव घेतल्याची उपरोधिक टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी तोडीस तोड उत्तर दिले.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर येताना पंढरपूर येथील मंदिरात जात विठ्ठलाचे दर्शन घेतले होते. तसेच त्याचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेचा रोख कोणात्या राजकिय पक्षाच्या नेत्याकडे होता हे उघड झाले.

नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला जुन्नर येथील सभेत उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, होय नरेंद्र मोदी यांचे म्हणणे खरं आहे. आत्मा अस्वस्थ आहे. तो पण स्वार्थासाठी नाही तर शेतकऱ्यांचं दुखणं बघून अस्वस्थ आहे. आज देशात महागाई प्रचंड वाढली आहे. लोकांना संसार करणं कठीण झालं आहे. त्यासाठी अस्वस्थ आहे. अडचणीत असणाऱ्या लोकांचं दुःख मांडणं आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे हे माझं कर्तव्य आहे. माझ्यावर तसे यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार असल्याचं प्रत्युत्तर मोदी यांच्या टीकेला दिले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, चांगलं काम करणाऱ्यांच्या विरोधात ईडीचा वापर केला जात आहे. ज्यांच्या हातात आहे ते लोक सत्तेचा गैरवापर करत आहेत, राजकियदृष्ट्या वेगळा विचार असलेल्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. सत्तेचा वापर हा लोकांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठीच करायचा असतो मात्र आताचे सत्ताधारी सत्तेचा वापर लोकांना अडचणी निर्माण करण्यासाठी केला जात असल्याची टीका केली.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. मी टीका केली आणि ती चुकीची असेल तर त्याला उत्तर देण्याचा अधिकारही आहे. मात्र झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी टीका केली म्हणून तुम्ही त्यांना तुरुंगात पाठवलं, तसंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीत चांगलं काम करत नरेंद्र मोदी यांच्या धोरणांना विरोध केला म्हणून त्यांनाही तुरुंगात टाकण्यात आलं. महाराष्ट्रात तर ही हुकूमशाही सुरु असल्याची टीकाही यावेळी केली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *