Breaking News

दिपक केसरकर म्हणाले; मुंबईतला तो निर्णय मान्य नाही, पण फ्लोअर टेस्टला कधीही तयार परिस्थिती बदलली की मुंबईत येवू

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांच्या गटात सहभागी झालेले कोकणातील आमदार दिपक केसरकर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या गटाची बाजू चांगलीच मांडली. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबतही भाष्य करत गटनेता बदलण्याचा मुंबईत झालेला निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे सांगत आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याने फ्लोअर टेस्टींगला कधीही तयार असल्याचे आव्हान शिवसेनेला दिले.

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली. तसेच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजाविल्यानंतर शिंदे गटाची आज बाजू मांडण्यासाठी दिपक केसरकर यांनी गुवाहाटीहून ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी दिपक केसरकर बोलताना म्हणाले की, घटनात्मक तरतुदीनुसार दोन त्रुतीयांश सदस्य आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्ही ‘फ्लोअर टेस्ट’ला केव्हाही तयार आहोत. आमच्याकडे बहुमत आहे. आमचा नेता बदलण्याचा मुंबईत विषय झाला तो आम्हाला मान्य नाही. आमचे नेते हे एकनाथ शिंदेच असतील आणि आहेत. बाळासाहेबांचा विचार मांडण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमच्या गटाचे नाव अजून ठरलेलं नाही. शिवसेनेच्या तिकिटावर आम्ही निवडून आलो आहोत असेही स्पष्ट केले.

जेव्हा आम्ही आमदार इकडे आलो तेव्हापासून महाराष्ट्रात वेगळं चित्र निर्माण झालं आहे. महाराष्ट्रात आमची कार्यालयं फोडली जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बदलेल, तेव्हा आम्ही मुंबईत येऊ. आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत. आम्ही इकडे आलेल्या आमदारांपैकी कोणीही पक्ष सोडलेला नाही. लोकांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं जातं आहे. हे चुकीचं आहे. कोणीही रस्त्यावर उतरण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले.

आम्ही महाराष्ट्रातून इकडे आल्यानंतर माध्यमांशी खूप कमी बोललो. मला एकनाथ शिंदे यांनी तुम्ही माध्यमांशी अधिकृत बोला असं सांगितलं आहे. काही दिवसांपासून सर्वांचा एक गैरसमज आहे की, आम्ही शिवसेनेत आहे की नाही? आम्ही सेनेतच आहोत. त्यामुळे कोणी वेगळी चर्चा करण्याची गरज नाही असल्याची सारवासारव त्यांनी केली.

उद्धव ठाकरेंना आम्ही अनेक वेळा सुचवलं होतं की, आपण ज्यांच्या सोबत होतो त्यांच्यासोबत राहू नये. आपल्या पक्षाची अधोगती होत आहे. अनेक जणांनी ही गोष्ट त्यांना सांगितली होती. परंतु, तरी देखील त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही. एवढं लोक सांगतात म्हणजे त्यामध्ये तथ्य आहे ना? पण याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आताही मी पुन्हा ही बाब त्यांच्या नजरेसमोर आणून देत आहे. आता बघु या ते काय निर्णय घेतात. उध्दव ठाकरे यांच्याबाबत आजही आमच्या मनात आदर आहे. त्यांच्या विरोधात आम्ही आजही बोलत नाही. पण सध्या जे काय सुरु आहे. ते त्यांनी थांबवायला हवे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी केली.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *