महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू ही त्या काळातली नेतृत्वाची पिढी होती. त्यांनी स्वातंत्र्यासाठी कष्ट केले. त्यानंतर देश उभा करण्यासाठी प्रचंड योगदान दिले. देशासाठी जे खपले, त्यांच्याबद्दलचा आदर, सन्मान ठेवण्याऐवजी त्यांच्यावर टीका-टिप्पणी करणे, यातच धन्यता मानणारे नेतृत्व आज दुर्दैवाने आपल्याला देशात पाहायला मिळतेय अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर करत त्यामुळे लोकांच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली.
सांगलीत भाजपाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कर्नाटकमधील काही समाजघटकांनी अल्पसंख्याकांच्या दुकानातून खरेदी न करण्याच्या केलेल्या आवाहनावर देखील त्यांनी टीका केली.
कर्नाटकात भाजपाचे राज्य आहे. तिथे अल्पसंख्याक समुदायातील लोकांच्या दुकानातून साहित्य घेऊ नका असा फतवा काही संघटनांनी काढला आहे. व्यवसाय कुणीही करू शकतो. व्यवसाय चांगला असेल, व्यवहार चांगला असेल तर त्याचा आदर करण्याची वृत्ती आपल्या समाजात आहे. पण तो अल्पसंख्याक जातीचा आहे म्हणून त्याचा मालच घेऊन नका, अशा प्रकारची कटुता राज्य हातात असणारे घटक करायले लागले, तर सामाजिक ऐक्य कसे ठेवायचे? हा प्रश्न आमच्यासमोर आहे. त्यामुळे या धर्मांध वृत्तींच्या विरोधात देखील आपल्याला लढाई द्यायची असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केली.
देशात सध्या धर्माच्या नावाखाली माणसांमध्ये अंतर निर्माण केले जात असून आज देशातले राजकारण एका वेगळ्या दिशेने जात आहे. राष्ट्र एका वेगळ्या लोकांच्या हातात आहे. महाराष्ट्रातही अनेक कर्तृत्ववान माणसं होऊन गेली. त्यांनी हा देश उभा केला. विकासाचे राजकारण केले. माणसं जोडण्याचं राजकारण केले. पण आज देशामध्ये धर्माच्या नावाने माणसांमध्ये अंतर निर्माण केले जात असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.
शरद पवार यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत असताना राज्यातील भाजपाकडून करण्यात येत असलेल्या राजकारणावरही त्यांनी यावेळी टीका केली. याशिवाय नवी लढाई लढण्याचा सुतोवाच त्यांनी यावेळी केला.
