Breaking News

फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला, निमंत्रण दिले नाहीतरी चालेल पण…. मेट्रो उद्घाटन सोहळ्यावरून लगावला टोला

मुंबईतील मेट्रोल मार्ग २ आणि मेट्रो मार्ग ७ च्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले नाही. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टोला लगावला असून मेट्रो उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण दिलं नाही तरी चालेल मात्र प्रकल्प मार्गी लावा असा खोचक टोला लगावत याचबरोबर मेट्रो-३ सुरू करण्याचं आव्हानही दिले.
‘मेट्रो २ अ’ (दहिसर ते डी. एन. नगर) आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर ते अंधेरी) मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आरे मेट्रो स्थानक येथे आज शनिवार दुपारी चार वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदींची उपस्थिती राहणार आहेत.
मात्र या उद्घाटन समारंभाच्या अगोदर श्रेयावादाची लढाई सुरू झाली असून मेट्रो उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी भाजपाकडून मेट्रोचे काम आम्ही केल्याचे सांगत मुंबईने पाहिलंय असा मथळा त्यावर देण्यात आला आहे. काम केलंय मुंबईने पाहीलंय, असा भाजपाने दावा केला आहे. तर दुसरीकडे लोकार्पण सोहळ्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण नसल्याचे समोर आल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.
या पार्श्वभूमीवर माध्यमांना प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांनी जरूर उद्धाटन करावे. पण जनतेला हे माहिती आहे, या दोन्ही मेट्रो आणि याचे काम देखील सुरू मी केले होते. अतिशय वेगाने ते काम पुढे गेले होते. काही कारणाने या सरकारमध्ये ते रखडलं. पण आज ते सुरू होतय. आम्हाला बोलावले नाही तरी चालेल, मात्र पण सगळ्या मेट्रो सुरू करा. आम्हाला बोलावले नाही तरी चालेल पण मेट्रो तीनचा प्रश्न निकाली काढा. कारण, मेट्रो ३ जी आतापर्यंत सुरू होऊ शकली असती, ती आणखी चार वर्षे सुरू होऊ शकणार नाही. त्यामुळे सरकारने श्रेय जरूर घ्यावे. पण अपश्रेयाचे भागीदार होऊ नये असा उपरोधिक टोलाही लगावला.
सरकारने मेट्रो ३ चा रखडलेला प्रकल्प हा तत्काळ पूर्ण करावा असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले आहे.
पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर रात्री ८ वाजता या मार्गिकेवरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. रात्री दहापर्यंत मेट्रोच्या १० ते १२ फेऱ्या चालविल्या जाणार आहेत. रविवारपासून मात्र सकाळी ६ ते रात्री १० अशी वेळापत्रकानुसार मेट्रो धावणार आहे. ‘मेट्रो २ अ’मधील डहाणूकरवाडी ते आरे आणि ‘मेट्रो ७’मधील दहिसर ते आरे असा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही मार्गिकेचा मिळून एकूण २०.७३ किमीचा हा टप्पा असणार आहे. या मार्गावर स्वयंचलित ११ मेट्रो गाडय़ा धावणार आहेत. असे असले तरी सुरुवातीचे काही महिने मेट्रोचालक (मेट्रो पायलट) मेट्रो गाडय़ा चालविणार आहेत. त्यानंतर विनाचालक गाडय़ा धावणार आहेत. मात्र त्या मेट्रो चालकांच्या देखरेखीखालीच चालणार असल्याचे एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी सांगितले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *