Breaking News

मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांवर पलटवार, तुम्ही रात्रीतून झाडं कापली मुंबईकरांनी पाहिली मुंबईवर प्रेम असेल तर कांजूरची जागा द्या ना मग

आम्ही काय करतो, तुम्ही काय करता, हे राज्यातील जनता पहात आहे. कौरवांचे चाळे बघून गप्प राहणारा धृतराष्ट्र हा महाराष्ट्र नाही, हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तुम्ही रात्रीतून झाडं कापली, सगळ्या मुंबईकरांनी पाहिली ना असा खोचक पलटवार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावत पर्यावरण संतुलित विकास करण्याला आमचं प्राधान्य असून हॉस्पीटलमध्ये जाण्याची वेळ येऊ नये ही माझ्यासाठी विकासाची संकल्पना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई मेट्रो २ए आणि मेट्रो-७ या दोन मार्गिकेचा उद्घाटन सोहळा आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक मंत्री आणि शिवसेनेचे आमदार उपस्थित होते.

मेट्रोच्या कामासाठी ज्यांचे ज्यांचे हात लागले त्या सगळ्यांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद. हे काम करतांना ज्या अडचणी आल्या तरीही आपण कामं केलं, त्याचे फोटो सगळ्यांना दाखवा, त्यांनाही कळू देत काम करताना किती आणि कशा अडचणी आल्या. मुंबईवरचं प्रेम कामातून दिसावं लागते असे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, बुलेट ट्रेनसाठी आग्रह ते धरणार. पण मुंबईकरांसाठी बुलेट ट्रेनचा काय उपयोग असा उपरोधिक सवाल करत मुंबईकरांवर प्रेम आहे तर कांजूरमार्गाची जागा मेट्रोसाठी का नाही देत, बदलापूरपर्यंत मेट्रोने जाऊ शकू, मुंबईच्या पंपीग स्टेशनसाठी, धारावीच्या पुर्नविकासासाठी जागा मागतो ते देत नाहीत. का नाही हे काम मार्गी लावत अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केला.

या सर्व विकास कामांचे श्रेय खऱ्या अर्थाने मुंबईकरांना आहे. मुंबईकर आणि महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाठकणा. तो आपण कायम ताठ ठेवण्याचे काम करूया असे आवाहन करत देशाच्या उत्पन्नात सर्वाधिक महाराष्ट्राचे योगदान पण महाराष्ट्राला परत काय मिळतं ? असा सवाल करत महाराष्ट्राच्या हक्काचं मागत आहोत, भीक नाही मागत, ते नाकारण्याचे काम करू नका असा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला.

तुमच्याही कामांना आम्हीही पुढे नेण्याचे काम करत आहोत. समृद्धी महामार्ग नागपूरहून पुढे गडचिरोलीला नेत आहोत. त्याचधर्तीवर पहिली बुलेट ट्रेन राजधानी उपराजधानीला जोडणारी हवी होती अशी अपेक्षा व्यक्त करत महागाई कमी होत नाही, इंधन दर वाढत आहे असे अनेक प्रश्न आहेत, नागरिकांच्या या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळेच आपल्या कामांवर होणाऱ्या आरोपांकडे लक्ष देऊ नये अशी टीकाही त्यांनी केली.

आज चार महत्वाचे कार्यक्रम केले. पोलीस हेल्पलाईनची सुविधा दिल्याने प्रत्येक पाऊली मुंबईकर सुरक्षित आहे. सुरक्षित मुंबई आणि सुरक्षित महाराष्ट्राची ओळख देणारे आजचे पोलीस विभागाचे कार्यक्रम करण्यात आले. मुंबईकरानो तुमच्या हिताच्या कामांसाठी पाठीशी उभे राहा असे आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना विनंती केली.

आजच्या चारही कार्यक्रमात मी पाहिलं, आवर्जुन मी आणि उपमुख्यमंत्री यांनी मास्क घातला आहे बाकी कुणीच नाही. मास्क सक्ती नसली तरी मुक्ती नाही हे ही आपण लक्षात घेतलं पाहिजे. संकट टाळण्यासाठी मास्क घाला. आजचा दिवस मुंबईकरांसाठी आनंदाचा आहे. मी आजच्या चार कार्यक्रमांपैकी दोन ऑनलाईन कार्यक्रम राष्ट्रवादीकडील विभागाचे केले आणि दोन कार्यक्रमात प्रत्यक्षात आलो ते शिवसेनेचे होते. लगेच यावरून बोलायला सुरुवात होईल. पण त्यांना सांगतो आमची लाईन एक आणि बरोबर आहे. ती वाकडी तिकडी कधी जाणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. विस्तारत जाणारी मुंबई, अथांग सागर आणि झपाट्याने वाढणारी लोकसंख्या ही मुंबईची आजची अवस्था असून त्यामुळे सुविधांवर ताण येत नक्कीच येत आहे. इमारतींचा एफएसआय वाढवता येतो पण रस्त्यांचा कसा वाढवायचा असा सवाल उपस्थित करत त्यातही अंथरूण कमी असलं तरी हातपाय पसरण्याचा प्रयत्न करतोय असेही ते म्हणाले.

गेल्या साठ वर्षात मी बदलती मुंबई पहात आलो. लहानपणी बाळासाहेब आणि माँ ने मला ट्रामने फिरवलं. ट्राम गेल्याचे दु:ख झाले. पण रिक्षा, टॅक्सी, लोकल, बेस्ट आली आता मेट्रोही अशी आठवण त्यांनी सांगितले.

लोकलची अशी स्थिती की फलाटावर उभं राहिलं की आपण आपोआप लोकलमध्ये जातो आणि बाहेर येतो, गर्दी वाढली पण सुविधा किती द्यायच्या, यापूर्वी अनेक प्रकल्पाचे नारळ फुटले, जलपुजन झालं पण प्रकल्प प्रत्यक्षात आले नाहीत पण त्यात जे केले नाही ते आम्हीच केलं म्हणण्याची नवी साथ आलीय असा टोला फडणवीस यांना लगावत ज्यांना पोटदुखीचा त्रास आहे अशा रुग्णांकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले.

Check Also

संध्या सव्वालाखे यांचा आरोप, महिला आयोगाच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून गैरवापर

महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *