Breaking News

राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवाय गोव्यात सरकार बनणार नाही गोव्याची संस्कृती जपतानाच फॅमिली टुरिझमच्या माध्यमातून कायापालट करणार - नवाब मलिक

मराठी ई-बातम्या टीम

गोव्यामधील तरुणांना रोजगार नाही, पर्यटनासंबंधी काही प्रश्न आहेत, तसेच गोव्याची संस्कृती जतन करण्याचीही गोवेकरांची मागणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यावर ही संस्कृती जपतानाच फॅमिली टुरिझमच्या माध्यमातून गोव्याचा कायापालट करु असे आश्वासन गोव्याचे स्टार प्रचारक व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिले.

गोव्यात १३ जागांवर राष्ट्रवादी निवडणूक लढवत आहे. कोणत्याही पक्षाला गोव्यात स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बिगर भाजप आघाडीला पाठिंबा देऊन गोवेकरांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गोवा विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन यावेळी नवाब मलिक यांनी केले. यावेळी स्टार प्रचारक क्लाईड क्रास्टो, गोव्याचे प्रदेश सरचिटणीस अनिल झोलापुरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष सतीश नारायणी उपस्थित होते.

गोवा हे पूर्वी शेतीप्रधान राज्य होते. आताही गोव्यात ३८ टक्के लोक शेती करत आहेत. मात्र त्यांना सिंचनाच्या सुविधा दिलेल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यास सिंचनाच्या व्यवस्था, ग्रीन हाऊसेसची सुविधा, फळबाग-फुलबागा फुलविण्यासाठी विविध अनुदाने देण्यात येतील. पशूसंवर्धन व पशूपालनाच्या माध्यमातून जोडधंदा देण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच गोव्यात ॲक्वा फिशिंग कमी होत आहे. समुद्रातील मासेमारीसोबत फिश फार्मिंगसाठी प्रोत्साहन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गोव्यामध्ये शेतीत काम करण्यासाठी शेतमजूर मिळत नाहीत, अशी बाब अनेकांनी निदर्शनास आणून दिली. शेतमजूर मिळवून देण्यासाठी मनरेगासारखी योजना गोव्यासाठी तयार करता येईल का? याचाही विचार राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यास करेल असे आश्वासन त्यांनी दिले.

गोव्यात पर्यटन हा सर्वात मोठा व्यवसाय आहे. गोव्यात कुटुंबाधारीत पर्यटन कसे वाढवता येईल, याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. सध्या गोव्यात कसिनोप्रधान टुरिझम आहे. मध्यमवर्गीयांना गोव्याचे पर्यटन परवडत नाही. त्यासाठी फॅमिली संकल्पना सुरु करणार आहोत. गोव्यात राहणाऱ्या स्थानिकांच्या घरात पुरेशा खोल्या असतील तर त्यांना पर्यटन परवाना देऊन त्यांना व्यवसाय करण्याची मुभा देण्यात येईल. जेणेकरुन सामान्य लोकही पर्यटन व्यवसाय करु शकतील. तसेच घरातच हॉटेल सुरु करण्याची मुभा देण्यात येईल. त्यामुळे गोव्याच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करता येईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

तसेच कौशल्य विकास करण्यासाठी वेबसाईट तयार केली जाईल. त्यामाध्यमातून सामान्य लोकांना पर्यटनाच्या सुविधा कशा द्याव्यात, याचे प्रशिक्षण देण्यात येईल. आज गोव्याचे वार्षिक दरडोई उत्पन्न हे ४ लाख ६६ हजार रुपये आहे. मात्र काही निवडक भांडवलदारांच्या उत्पन्नामुळे हे दरडोई उत्पन्न फुगलेले दिसत आहे. सामान्य लोकांचे उत्पन्न कमी आहे. फॅमिली टुरिझमच्या संकल्पनेमुळे सामान्य लोकांच्या हातात पैसे जातील. ज्यामुळे बेरोजगारी दूर होण्यास मदत होईल अशी एपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

गोव्याचा विकास साधत असताना पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होता कामा नये. राष्ट्रीय हरीत लवादाचे नियम पाळून मायनिंग पुन्हा सुरु झाले पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र मायनिंगचे कंत्राट देताना त्यात लिलाव पद्धत आणली तर सरकारला महसूल मिळेल. मायनिंगवर कायमची बंदी घालणे हा उपाय नसल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या विरोधात सीबीआयकडून ब्लू कॉर्नर नोटीस

हसन लोकसभा मतदारसंघातील जनता दल एस चे उमेदवार प्रज्वल रेवन्ना याच्या कथित सेक्स स्कॅडलचे प्रकरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *