Breaking News

रोहित पवारांचा टोला, तेव्हा गप्प असणारी मंडळी आता सावरकरप्रश्नी रणकंदन माजवतायत

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर राहुल गांधी यांनी स्वा.वि.दा. सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून आणि जाहिर केलेल्या पत्रामुळे भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतली. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर टीकेची झोड उठवित कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अवमान झाला. त्यावेळी गप्प असणारे आता सावरकर प्रश्नावरून रणकंदन माजवत आहेत असा टोला लगावला.

महाविकास आघाडीत या विषयावरून फूट पडेल असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलेले असले तरी त्यांची ही प्रतिक्रिया तत्कालीन आहे. त्यातून महाविकास आघाडीला तडा जाईल, असे अजिबात नाही. महाविकास आघाडी (मविआ) मध्ये फूट पडावी असे भाजपा- शिंदे गटाला वाटत असल्याने त्यांनी या प्रकरणात जादा ताकद लावली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले दाम्पत्यांच्या बाबतीत त्यांना राजकीय फायदा दिसला नव्हता. सावरकर प्रकरणात तो दिसत आहे. शिवाय मविआमध्ये काही बिनसले तर आगामी निवडणुका सोप्या जावू शकतात, असे त्यांना वाटत असल्याने या विषयाला फूस दिली जात असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले.

सावरकर यांच्याविषयी माझा फारसा अभ्यास नाही. परंतु या प्रकरणी सर्वपक्षीयांसह विचारवंतांनी एका व्यासपीठावर येत चर्चा घडवून आणावी. खरा इतिहास जनतेसमोर आणावा. सावरकरांच्या विषयात राजकारण बाजूला ठेवून राहुल गांधी यांनी दाखवलेले पत्र, सावरकर यांचे लिखान समजून घेतले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधींचा कोणता दाखला या विषयी दिला, हे मला माहित नाही. परंतु अशा विषयात राजकारण करण्यात कोणाचेच हित नसल्याचे ते म्हणाले.

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, राज्यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी राज्यपालांनी अवमानजनक वक्तव्य केले होते. हर हर महादेव चित्रपटात शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास दाखवला गेला, कर्नाटकात छत्रपतींच्या पुतळ्याचा अवमान झाला, तेव्हा गप्प असणारी मंडळी सध्या सावरकरांच्या विषयावरून रणकंदन माजवत आहेत. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात दरी पाडून ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी या मुद्द्याचा वापर होत असल्याचे मतही व्यक्त केले.

काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यापासून विविध मुद्दे पुढे आले आहेत. सुरुवातीला टिकलीचे प्रकरण निघाले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्याबद्दल एका मंत्र्याने अवमानजनक वक्तव्य केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांना जेलमध्ये टाकण्यात आले. त्यानंतर दुसरी केस त्यांच्यावर टाकली गेली. खासदार राऊत यांचा जामीन रद्द व्हावा यासाठी न्यायालयात धाव घेतली गेली. हे सगळे मुद्दे महाराष्ट्रात यात्रा असतानाच का निघाले? असा सवाल आमदार पवार यांनी करत यात्रेला मिळणारा प्रतिसाद लोकांपर्यंत पोहोचू नये, यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जात असल्याचा प्रश्न मलाच नव्हे तर लोकांनाही पडू लागल्याचे ते म्हणाले.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *