Breaking News

संभाजी राजे म्हणाले, ते असं का बडबडतात? हात जोडून विनंती कोश्यारींना हटवा

आपल्या सततच्या वादग्रस्त वक्तव्ये करत वाद उत्पन्न करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नितीन गडकरी यांच्याशी केल्याने नवा वाद निर्माण झाला. यापार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजी राजे यांनी खोचक टीका करत मी हात जोडून विनंती करतो की पंतप्रधान मोदींनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटवावे अशी मागणी केली.

संभाजी राजे हे आज परभणीच्या दौऱ्यावर आहेत. तेथील कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान मोदींकडे मागणी केली.

यावेळी संभाजी राजे म्हणाले, राज्यपाल असं का बडबडतात?  मला समजत नाही. याआधीही त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन हटवावं अशी मागणी मी पंतप्रधान मोदींकडे केली होती. आताही मी तीच मागणी करतोय. खरंच अशी व्यक्तीच आम्हाला महाराष्ट्रात नको. या महाराष्ट्राचे वैभव छत्रपती शिवाजी महाराज असंख्य जणांचे प्रेरणास्त्रोत आहेत. महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे. घाणेरडे शब्द आणि इतके घाणेरडे विचार राज्यपालांच्या मनामध्ये येऊच कसे शकतात? यांना राज्यपाल म्हणून ठेवलंत तरी कसं? अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींनी आधी यांना राज्यातून बाहेर पाठवलं पाहिजे. मागेही अशी मागणी मी केली होती. आताही मोदींना हात जोडून विनंती करतो प्लीज प्लीज अशी व्यक्ती आम्हाला महाराष्ट्रात नको. या महाराष्ट्राचे वैभव छत्रपती शिवाजी महाराज असतील, महापुरुष असतील, संत असतील. त्यांच्याविषयी इतके घाणेरडे विचार राज्यपालांच्या मनामध्ये येऊच कसे शकतात? मोदीजी तुम्ही यांना राज्यपाल म्हणून ठेवता तरी कसं? या व्यक्तीला महाराष्ट्रातून बाहेर काढावं. त्यांना कुठे ठेवायचे तिथे ठेवा, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र अशा गोष्टी सहन करणार नाही. किती दिवस आम्ही गप्प बसायचं. शिवाजी महाराजांबद्दल ते पूर्वीही बोलले होते. महात्मा फुलेंबद्दल बोलले होते. इथे येऊन फक्त आमच्या महापुरुषांबद्दल गरळ ओकायची एवढा एकच अजेंडा राबवायचं ठरवलंय का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

राज्यपाल नेमकं काय म्हणाले?

आम्ही जेव्हा शाळेत जायचो, तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे, तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. महाराष्ट्र नवरत्नांची खाण आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *