Breaking News

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवार बोलल्यानंतर उध्दव ठाकरे…

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानावरून सध्या राज्यातलं राजकारण तापलेलं असताना त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यामुळे त्यात आणखी भर पडली आहे. या दोघांच्या वक्तव्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेंस आणि उध्दव ठाकरे यांची शिवसेना राज्यपाल कोश्यारी आणि भाजपावर तुटून पडलेले दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती उदयनराजे यांनी पत्र लिहिल्यानंतर शरद पवारांच्या लक्षात आलं की आपल्यासमोर घटना घडली आणि आपण त्यावर कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. उदयनराजेंनी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया आज दिली. शरद पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर उद्धव ठाकरेंना प्रतिक्रिया द्यावीच लागते असा उपरोधिक टोलाही लगावला.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले, काँग्रेस, ठाकरे गट, शिंदे गट अशा सगळ्यांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका मांडली. यानंतर आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यावरून राज्यपालांना आणि भाजपालाही लक्ष्य केलं.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालय योग्य निर्णय घेईल याची आम्हाला अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा कुणीही मोठं नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्रीही मोठे नाहीत किंवा इतर कुणीही मोठं नाही. त्यामुळे त्यांनी काहीही दावा ठोकला, तरी महाराष्ट्रातलं एकही गाव जाणार नाही. आमचा सीमाभाग आम्हाला परत मिळेल ही मला अपेक्षा आहे असा विश्वास व्यक्त केला.

मी कुठलंही चिथावणीखोर वक्तव्य केलेलं नाही. मी एवढंच सांगितलं की बेळगाव, कारवार, निपाणीसह इतर गावांवर आम्ही दावा सांगितला आहे. तो दावा काही आज सांगितलेला नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात त्यासाठी भांडत आहोत. ती भूमिका मी मांडली. त्या मागणीला चिथावणीखोर म्हणणं चुकीचं आहे असे प्रत्युत्तरही देवेंद्र फडणवीसांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिले.

माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की आमच्यापेक्षा जास्त काळ कर्नाटक, महाराष्ट्र आणि केंद्रात काँग्रेस आणि मित्रपक्षांचं सरकार होतं. मग तेव्हा प्रश्न सुटला का? त्यामुळे बोलताना प्रत्येकानं विचार करून बोललं पाहिजे. शेवटी वेगवेगळी सरकारं कर्नाटकमध्ये आपण पाहिली. त्यांनी सातत्याने तीच भूमिका ठेवली आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकारांनीही तीच भूमिका ठेवली आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात पक्षाचा वाद सीमावादात आपण कधीही आणला नाही. आताही कुणी आणू नये. त्यामुळे सीमेबाबतचा आपला वाद खिळखिळा होईल, असेही ते म्हणाले.

त्यामुळे आता त्याला राजकीय रंग कसा देता येईल? याचा प्रयत्न सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज उभ्या भारताचं दैवत आहेत. त्यामुळे त्याबद्दल कुठला वादही होऊ शकत नाही. त्यावर कुणी राजकाऱण करणं हेही योग्य होणार नाही. आज हे उदयनराजेंच्या पत्रामुळे खडबडून जागे झाले आहेत, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *