Breaking News

राज्यपाल कोश्यारींनी अभिभाषण अर्धवट सोडणे हा महाराष्ट्राचा अपमान राज्यपालांना परत पाठवण्याचा ठराव विधिमंडळात आणण्यावर विचार करु !: नाना पटोले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई यांचा अवमान केला आहे. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान महाराष्ट्र कदापीही सहन करणार नाही, या अपमानाबद्दल राज्यपालांना महाराष्ट्राची माफी मागावीच लागेल अशी मागणी करत राज्यपाल कोश्यारी यांना परत पाठवण्यासंदर्भात विधिमंडळात ठराव आणण्यासाठी कायदेशीर बाबींचा विचार करू, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.
आज अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहाच्या सदस्यांसमोर राज्यपालांचे अभिभाषण होणार होते. परंतु भाजपाच्या सदस्यांनी राज्यपालांनी भाषणास सुरुवात केल्यानंतर नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरुच ठेवली. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या भाषणातील फक्त दोन ओळी वाचून थेट सभागृहाच्या बाहेर पडले. तसेच त्यांनी राष्ट्रगीताने होणाऱ्या सांगता समारंभासही ते थांबले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते.
विधिमंडळातील अभिभाषण अर्धवट सोडून राज्यपाल कोश्यारी निघून गेले हे राज्यपालपदाला शोभणारे नाही, त्यांनी महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेचा घोर अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करु, शिवाजी महाराजांचा जयघोष राज्यपाल कोश्यारी व भारतीय जनता पक्षाला आवडो वा ना आवडो जयजयकार कोणीही थांबवू शकत नाही. शिवाजी महाराज व महात्मा फुले तसेच सावित्रीमाईंबद्दल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री नबाव मलिक यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर पटोले म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर आरोप झाले आहेत. त्यांचा राजीनामा मागण्याचा भाजपाला अधिकार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील डझनभर मंत्र्यांवर आरोप झाले, त्यावेळी फडणवीस यांनी किती मंत्र्यांचे राजीनामे घेतले? याचे उत्तर द्यावे. सर्वांना क्लिनचिट दिली होती. मंत्री नवाब मलिक यांचा दाऊद इब्राहिमशी संबंध लावणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला कुख्यात गुंड इक्बाल मिर्चीने पक्षाला दिलेला देणगीचा पैसा कसा चालतो ? इक्बाल मिर्ची भाजपाचा नातेवाईक आहे का? असा खोचक सवालही त्यांनी केला.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. हे अधिवेशन पूर्णवेळ चालेल, परंतु भाजपा जाणीवपूर्वक गोंधळ घालून त्यात अडथळे आणत असेल तर त्यांना जनता माफ करणार नाही असेही ते म्हणाले.

Check Also

विनोद तावडे यांचा टीका, संविधान ८० वेळा बदलणाऱ्या काँग्रेसचा…

गोव्यातल्या काँग्रेस उमेदवाराने गोव्यात भारतीय संविधान लागू करू नये, अशी मागणी केली आहे, तर कर्नाटकातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *