राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सुरुवात सांसदीय प्रथेप्रमाणे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भाषणाने होत असते. त्यानुसार राज्यपाला कोश्यारी यांनी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात अभिभाषणासाठी आले. मात्र भाषण सुरु केल्यानंतर भाजपाचे आमदारांनी सरकार विरोधी घोषणा द्यायला सुरुवात केल्याने राज्यपालांनी आपले भाषण दोनच मिनिटात आटोपते घेतले आणि राष्ट्रगीताची वाट न पाहताच थेट निघून गेले. त्यामुळे राज्यपालांकडून राष्ट्रगीताचा अवमान केल्याची चर्चा विधिमंडळ परिसरात सुरु झाली. विशेष म्हणजे राज्य विधिमंडळाच्या इतिहासात राज्यपालांनी अवघे २ मिनिटे भाषण केल्याची घटनाही पहिल्यांदाच घडली.
सांसदीय लोकशाही प्रथेप्रमाणे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. हे अभिभाषण जर दोन सभागृहे असतील तर दोन्ही सभागृहाच्या सदस्यांसमोर किंवा एकच सभागृह असेल तर एकाच सभागृहाच्या सदस्यांसमोर राज्यपालांचे अभिभाषण होते. त्यानुसार आज राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहासमोर राज्यपालांचे अभिभाषण होणार होते. त्यासाठी राज्यपाल कोश्यारी संयुक्त सभागृहात आले असता सत्ताधारी महाविकास आघाडीच्या सदस्यांनी राज्यपालांच्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. मात्र तरीही राज्यपालांनी शांतपणे मंचावरील आपल्या स्थानावर पोहोचले. त्यावेळी सत्ताधारी बाकावरील सदस्य शांत झाले. त्यानंतर राष्ट्रगीत झाले आणि राज्यपालांनी आपल्या अभिभाषणाला सुरुवात केली. त्यावेळी भाजपाच्या आमदारांनी फलक फडकावीत मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणा देण्यात सुरुवात करत मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे राज्यपाला भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या भाषणातील दोन ओळी वाचून झाल्यातरी भाजपाचे सदस्य घोषणा देण्यापासून थांबले नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी आपल्या भाषणाची पुस्तिका तशीच पटलावर ठेवत मी भाषण पटलावर ठेवल्याचे सांगितले आणि ते तडक मंचावरून बाहेर निघुन गेले.
वास्तविक पाहता राजशिष्टाचारानुसार अभिभाषणाच्या सुरुवात राष्ट्रगीताने आणि त्याचा शेवट राष्ट्रगीतानेच होतो. त्यामुळे राज्यपालांनी आपले भाषण पटलावर ठेवल्यानंतर राष्ट्रगीत होईपर्यंत थांबणे आवश्यक होते. परंतु त्यांनी तसे न करता राज्यपाल थेट निघून गेले. त्यामुळे राष्ट्रगीताचा अवमान दस्तुरखुद्द राज्यपालांनीच केल्याची चर्चा विधिमंडळ परिसरात सुरु झाली.
