Breaking News

राज्यपालांच्या “त्या” कृतीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, केवळ भाजपाच्या… राज्यपालाकडून राष्ट्रगीताचा अवमान: राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

भाजपा आमदारांच्या बेशिस्तपणामुळे महामहिम राज्यपाल यांना सभागृह सोडावे लागले. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न घडलेली दुर्दैवी घटना आज घडलेली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आम्हीही विरोधी पक्षात होतो. पण आम्ही कधीच सभागृहाचा अपमान केला नाही. राज्यपाल सभागृहात आले तेव्हा महाविकास आघाडीच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत त्यांचे स्वागत केले. मात्र भाजपाच्या लोकांनी गोंधळ घातला. फलके झळकवली, त्यामुळे राज्यपाल महोदय राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच निघून गेले. हा राष्ट्रगीताचाही अपमान असल्याचे त्यांनी सांगितले.
नेमके काय झाले राज्यपालांच्या भाषणावेळीः
सांसदीय लोकशाही प्रथेप्रमाणे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. हे अभिभाषण जर दोन सभागृहे असतील तर दोन्ही सभागृहाच्या सदस्यांसमोर किंवा एकच सभागृह असेल तर एकाच सभागृहाच्या सदस्यांसमोर राज्यपालांचे अभिभाषण होते. त्यानुसार आज राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहासमोर राज्यपालांचे अभिभाषण होणार होते. त्यासाठी राज्यपाल कोश्यारी संयुक्त सभागृहात आले असता सत्ताधारी महाविकास आघाडीच्या सदस्यांनी राज्यपालांच्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने घोषणाबाजी केली. मात्र तरीही राज्यपालांनी शांतपणे मंचावरील आपल्या स्थानावर पोहोचले. त्यावेळी सत्ताधारी बाकावरील सदस्य शांत झाले. त्यानंतर राष्ट्रगीत झाले आणि राज्यपालांनी आपल्या अभिभाषणाला सुरुवात केली. त्यावेळी भाजपाच्या आमदारांनी मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणा देत मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या भाषणातील दोन ओळी वाचून झाल्यातरी भाजपाचे सदस्य घोषणा देण्यापासून थांबले नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी आपल्या भाषणाची पुस्तिका तशीच पटलावर ठेवत मी भाषण पटलावर ठेवल्याचे सांगितले आणि ते तडक मंचावरून बाहेर निघुन गेले. यावेळी ते निरोपाच्या राष्ट्रगीतासाठीही थांबले नाहीत. त्यामुळे राज्यपालांच्या गैरहजेरीतच राज्यपालांच्या अभिभाषणाचा समारोप करण्यात आला.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नाना पटोले यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहित शेतकऱ्यांसाठी केली ही मागणी

राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अपार नुकसान केले आहे. राज्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *