Breaking News

‘वंदे मातरम्’ला विरोध करून काँग्रेसने देशविरोधी मानसिकता दाखवली भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दूरध्वनीवर हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणावे या राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध करून काँग्रेसने आपली देशविरोधी मानसिकताच दाखवली आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. ‘वंदे मातरम्’ला विरोध करणारे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्वातंत्र्य संग्रामात वंदे मातरम् म्हणत म्हणत फासावर चढलेल्या हुतात्म्यांचा अपमान केला असून त्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

शासकीय कर्मचाऱ्यांनी दूरध्वनीवर बोलण्यास सुरुवात करताना हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणावे, या राज्य शासनाच्या निर्णयाला माजी मंत्री व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विरोध केला आहे.

या संदर्भात बोलताना उपाध्ये म्हणाले की, वंदे मातरम् हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहे. भगत सिंह, राजगुरू यांच्या सारखे अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेले सामान्य कार्यकर्ते वंदे मातरम् म्हणतच फासावर चढले. बाळासाहेब थोरात यांना हा इतिहास माहीत नाही असे शक्य नाही. तरीही त्यांनी ‘वंदे मातरम्’ला विरोध करणे दुर्दैवी आहे.

पंडित नेहरूंच्या पणतूच्या काळात काँग्रेसची राष्ट्रप्रेमाची व्याख्या कदाचित बदलली असावी. त्यामुळे भारत तेरे तुकडे होंगे या सारख्या देशविरोधी घोषणा देणाऱ्या प्रवृत्तींना नेहरूंचे पणतू राहुल गांधींनी पाठिंबा दिला. भारत जोडो म्हणत यात्रा काढायची आणि दुसरीकडे ‘वंदे मातरम्’ला विरोध करायचा यातून काँग्रेसचा दुटप्पी, ढोंगी चेहरा उघड झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

देशविरोधी भूमिका घेतल्याबद्दल बाळासाहेब थोरात यांनी तातडीने माफी मागावी, अन्यथा त्यांना जनतेच्या संतापास सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *