Breaking News

अर्थसंकल्पातील घोषणांवर विरोधकांची टीका तर सत्ताधाऱ्यांकडून स्वागत निवडणूका नजरेसमोर ठेवून अर्थसंकल्प जाहीर

मुंबईः प्रतिनिधी

देशाचे भविष्यकालीन चित्र मांडण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करत देशातील गरीबांवर विविध घोषणांचा पाऊस पाऊस पाडला. मात्र यंदाचा अर्थसंकल्प हा आगामी लोकसभा आणि पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांच्यादृष्टीने मांडण्यात आल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तर सत्ताधारी भाजपकडून अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले आहे.

रब्बी पिकांसाठी दीडपट हमीभावाची घोषणा शुद्ध फसवणूक विखे पाटील

रब्बी पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्यात आल्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला असून हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ जुमलेबाजी असल्याची खरमरीत टीकाही केली.

रब्बी पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्यात आल्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा वस्तुस्थितीशी सुसंगत नाही. कृषि मूल्य आयोगाने गव्हाला १ हजार ७३५ रूपये तर तुरीला ४ हजार २५० रूपये हमीभाव प्रस्तावित केला होता. तेच दर केंद्र सरकारने हमीभाव म्हणून जाहीर केले. मात्र हे दर उत्पादन खर्चाच्या दीडपट नफा देणारे नाहीत. पुढील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने देशाला जुमले विकण्याचे प्रयत्न केले आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सांगितले होते. त्याचे पुढे काय झाले, ते संपूर्ण देशाला माहिती आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पातील नव्या जुमलेबाजीवर जनता विश्वास ठेवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

काल चंद्रग्रहण तर आज अर्थसंकल्पात तारेः सुनिल तटकरे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष

कालरात्री चंद्र ग्रहण पाहिलं. मात्र आज अर्थससंकल्पामुळे दिवसात तारे दिसल्याची उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली. आजच्या अर्थसंकल्पावरून हे सरकार मूठभर भांडवलंदारांचे असल्याचे प्रकर्षाने जाणवले आहे. देशातील गरीबांना परवडणारी घरे देण्याची घोषणा यापूर्वीही करण्यात आली. मात्र परवडणाऱ्या घरांची आधीच्या घोषणेत केलेली संख्या आणि आताची संख्येत तफावत असून गतवर्षीच्या तुलनेत आताची नगण्य आहे. त्याचबरोबर फिसकल डेफिसिट वाढला हे समोर आलं आहे. ऐन अर्थसंकल्प सुरु असतानाच शेअर बाजारातील सेन्सेक्सने ३०० पातळीने खाली येणं यातून अर्थसंकल्पाचे परिणाम स्पष्ट होत असून युपीएच्या काळातील पिण्याच्या पाण्याच्या योजनाचा निधी बंद केलाय आणि घरं, वीज वाबत आता घोषणा केल्या जात आहेत. मात्र देशातील जनता २०१९ ला यांना जागा दाखवेल हे अनुमान काढायला हरकत नसल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 

र्वसामान्यांच्या आकांक्षा पूर्ण करणारा ऐतिहासिक अर्थसंकल्पः रावसाहेब दानवे भाजप प्रदेशाध्यक्ष

 सर्वसामान्यांच्या आकांक्षा पूर्ण करणारा हा ऐतिहासिक अर्थसंकल्प असून त्यामध्ये शेती, ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार निर्मिती यावर भर देण्यात आला आहे. शेतमालाला उत्पादनाच्या दीडपट हमीभाव, दहा कोटी गरीब कुटुंबांना दरवर्षी प्रत्येकी पाच लाख रुपयांची आरोग्य उपचारांसाठी तरतूद असलेली जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना, शेती – ग्रामीण पायाभूत सुविधा – आरोग्य सुविधा अशा विविध प्रकारे ग्रामीण क्षेत्रासाठी विविध खात्यांमार्फत एकूण साडेचौदा लाख कोटींची तरतूद, तरुणांना रोजगार निर्मितीस मदत करण्यासाठी मुद्रा योजनेत यंदा तीन लाख कोटी रुपयांची भरघोस तरतूद, सर्वांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी भरघोस आर्थिक तरतूद अशी अनेक वैशिष्ट्ये या ऐतिहासिक अर्थसंकल्पाची आहेत.

‘सबका साथ-सबका विकास’ संकल्पनेसह नवभारताच्या निर्मितीकडे वाटचाल : मुख्यमंत्री

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक आहे. या अर्थसंकल्पाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ‘सबका साथ-सबका विकास’ ही संकल्पना आणखी विस्तारित झाली आहे. सर्वसमावेशक असलेल्या या अर्थसंकल्पातून नवभारताच्या निर्मितीचा संकल्प करण्यात आला असून शेतकरी, गरीब, महिला, युवक, मागासवर्गीय आणि ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांना त्यातून न्याय देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ५० कोटी नागरिकांसाठी जगातील सर्वांत मोठी आरोग्य योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतून ५ लाख रूपयांपर्यंतचे आरोग्यकवच उपलब्ध होणार आहे. मुंबईची ‘लाईफलाईन’ असलेल्या लोकल रेल्वे वाहतुकीला अधिक भक्कम करण्यासाठी ४० हजार कोटींची भरीव तरतूद ही मुंबईसह अवघ्या महाराष्ट्रासाठी आनंददायी आहे. आजवर इतका मोठा निधी कधीही मुंबईला प्राप्त झालेला नव्हता. मुद्रा योजनेच्या माध्यमातून १० कोटी लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न झाला आहे.

“शेतकरी आणि कृषि अर्थव्यवस्थेला उभारी देणारा अर्थसंकल्प”- कृषीमंत्री फुंडकर

कृषि क्षेत्रातील कर्ज पुरवठा, पायाभूत सुविधा मजबूत करतानाच शेतक-यांच्या उत्पादनाला दीड पट हमी भाव देवून बाजार व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा व शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. याशिवाय सूक्ष्मसिंचन, अन्न प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय शेती आणि बांबू शेती याकरीता भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच देशात ४२ मेगा फूड पार्क विकसीत करुन शेतकरी कंपन्यांना उत्तेजन देण्यासाठी ऑपरेशन ग्रीन या योजनेसाठी भरीव निधी असलेला असा हा शेतकरीप्रणीत अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडला, त्‍याबददल त्यांचे मनापासून अभिनंदन !

 

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या विरोधात सीबीआयकडून ब्लू कॉर्नर नोटीस

हसन लोकसभा मतदारसंघातील जनता दल एस चे उमेदवार प्रज्वल रेवन्ना याच्या कथित सेक्स स्कॅडलचे प्रकरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *