Breaking News

आणि ऐन अर्थसंकल्पातच शेअर बाजार कोसळला शेअर्स नफ्यावर द्यावा लागणार कर

मुंबईः प्रतिनिधी
संसदेत अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी देशातील शेअर बाजार चांगलाच वधारला होता. मात्र, अर्थसंकल्पात दीर्घ मुदतीचा भांडवली नफा कर (लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स) आकारण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण सुरू झाली. सेन्सेक्स ३५ हजार ५२६ पर्यंत खाली आला होता. तर निफ्टीही १० हजार ९२१ पर्य़ंत घसरला. दुपारनंतर मात्र सेन्सेक्स खालच्या पातळीवरून ७०७ अंकाने पुन्हा सुधारला.
एका वर्षानंतर विकलेल्या शेअर्सपासून १ लाख रुपयांपेक्षा अधिक मिळणाऱ्या उत्पन्नावर १० टक्के दीर्घ मुदतीचा भांडवली नफा कर आकारण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली. त्यानंतर सकारात्मक असलेला बाजार घसरण्यास सुरूवात झाली. सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये अचानक वेगाने विक्री सुरू झाली. सकाळी २०० पेक्षा अधिक अंकाने वधारलेला सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकाने घसरला. सेन्सेक्स ५८ अंकाने घसरून ३५ हजार ९०६ वर बंद झाला. तर निफ्टी १० अंकाने घसरून ११ हजार १६ वर स्थिरावला. निफ्टीतील ११ पैकी ९ क्षेत्रांच्या निर्देशांकात घसरण झाली. ऑटो आणि एफएमसीजीचा निर्देशांक वगळता इतर निर्देशांक घसरले.

दीर्घ मुदतीचा भांडवली नफा कर 
एका वर्षानंतर विकलेल्या शेअर्सवर मिळालेल्या नफ्यावर आता १० टक्के दीर्घ मुदतीचा भांडवली नफा कर द्यावा लागणार आहे. एका वर्षानंतर शेअर्स विकल्यावर जर १ लाख रुपयांचा नफा होत असेल तर १० टक्के कर द्यावा लागेल. सध्या एका वर्षाच्या आत विकलेल्या शेअर्सवर १५ टक्के अल्प मुदतीचा भांडवली नफा कर द्यावा लागतो.

शेअर ५२ आठवड्यांच्य़ा उच्चांकावर
आज एल अँड टी, टीसीएस महिंद्रा अँड महिंद्रा, इंडिया बुल्स, बजाज ऑटो, इंडसइंड बँक, भारत फोर्ज, कोटक बँक, डॉबर, जेएसडबल्यू स्टील, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, टेक महिंद्रा, ओएनजीसी आणि एचयूएल या कंपन्यांचे शेअर्स ५२ आठवड्यांच्य़ा उच्चांकावर पोहोचले.

वित्तीय तूट ३.५ टक्के
आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये वित्तीय तूट ३.५ टक्के राहण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. जर वित्तीय तूट ३.२ टक्क्यांच्या आत सरकार ठेवेल तर ही बाब शेअर बाजारासाठी सकारात्मक असेल. मात्र, ३.५ टक्के लक्ष्य बाजाराला निऱाश करणारा असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Check Also

एसबीआयमध्ये १२ हजार फ्रेशर्सना संधी ८५ टक्के आयटी क्षेत्रातील नवतरूणांना प्रोबेशनरी ऑफिसर्स म्हणून नियुक्त्या

एसबीआय SBI, देशातील सर्वात मोठी असलेल्या बँकेत, FY25 मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर आणि सहयोगी म्हणून १२,००० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *