Breaking News

शरद पवार असतील… यांच्या कुठल्याही विरोधी पक्षाचं अस्तित्वच दिसत नाही पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांचा टोला

मराठी ई-बातम्या टीम

पाच राज्यातील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत उत्तर प्रदेश, गोव्यात सत्तांतर होणार असल्याचे भाकित केल्यानंतर भाजपा नेते तथा गो‌व्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार असतील किंवा मोठे नेते असतील, यांची अडचण अशी आहे की यांच्या कुठल्याही विरोधी पक्षाचं अस्तित्वच दिसत नाही. त्यामुळे आम्हाला उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार जाणार असे कुठेच दिसत नसून उलट मागील वेळेपेक्षा मोठ्या संख्येने आम्ही परत येवू. तर गोव्यामध्ये महाराष्ट्राप्रमाणे जनमताची चोरी होवू देणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

मला अतिशय आनंद आहे की आज गोविंद गावडे जे अपक्ष म्हणून निवडून आले होते व नंतर पाच वर्ष सरकारमध्ये मंत्री होते. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या मतदार संघात कमळ फुलणार याबद्दल कुठलीही शंका नाही. एकूणच बघितलं तर सर्वे असेल किंवा ग्राउंड रिअलिटी असेल भाजपाचं सरकार हे गोव्यात पुन्हा स्थापित होणार, या बद्दल आता फारशी शंका कुणाच्या मनात उरली नाही. आम्ही जनतेमध्ये चाललो आहोत, आमच्या रचना लावतो आहोत, केलेली कामे सांगत आहोत आणि त्या आधारवर आम्ही मत मागत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच, लाट ओसरत असल्याबाबतचे वक्तव्य शरद पवारांनी केल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, पहिली गोष्ट अशी आहे की, सर्वेमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपा स्पष्ट बहुमत दिसत आहे. मी त्याच्या पलिकडे जाऊन सांगेन, की उत्तर प्रदेशमधली जी काही हवा मला पाहायला मिळत आहे, ती मागच्या वेळेस पेक्षाही आम्ही पुढे जाऊ अशा प्रकारची हवा त्या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे भाजपाचे आणखी कमी होतायत यामध्ये आनंद मानायचा, एवढ्या पुरता त्यांचा आनंद आहे पण तो ही त्यांना काही फार साजरा करता येईल, असं दिसत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

भाजपा मंत्री मायकल लोबो व आमदाराने पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, जे बाहेर गेले ते त्यांच्या स्वार्थासाठी बाहेर गेले. आता ते तत्वाच्या गोष्टी सांगत आहेत. परंतु भाजपाकडून त्यांना जे काही मिळाले हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता भाजपामध्ये आपल्या पत्नीला तिकीट मिळत नाही आणि काँग्रेस दोन तिकीट आपल्याला देतेय या गोष्टीसाठी त्यांनी पक्ष बदलला आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण मला असे वाटते की भाजपा फार मोठी आहे, कोणाच्या जाण्याने या पक्षाला फार फरक पडेल असे नाही. त्या उलट येणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे भाजपा चांगल्या फरकाने सरकार तयार करेल. नाराजांची मनधरणी करणं, सगळ्यांना सोबत घेणं आणि एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरं जाणं हे माझं या ठिकाणी कामच आहे आणि ते आम्ही करू असेही ते म्हणाले.

गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याच्या अनुषंगाने पवारांनी सांगितले त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, त्यांनी जरूर प्रयोग करावा पण त्यांना गोव्यात आम्ही संधीच देणार नाही. गोव्याची जनताच स्पष्ट बहुमत भाजपाला देईल आणि ज्या प्रकारे जनमताची चोरी तीन पक्षांनी महाराष्ट्रात केली, ती चोरी गोव्यात आम्ही होऊ देणार नसल्याचा गर्भित इशाराही त्यांनी शरद पवार यांना दिला.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *