Breaking News

भाजपाच्या टीकेवर छद्मी हसून पवारांनी दिले उत्तर राज्याचे निर्णय मुख्यमंत्रीच घेतात

मराठी ई-बातम्या टीम

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी मध्यस्थी करत तोडगा काढण्यासाठी मदत केली. त्यावरून भाजपाने शरद पवार हे कोणत्याही संविधानिक पदावर नसताना बैठका कशा घेतात अशी टीका करत पवार हे मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिलाय का? अशी खोचक टीका केली.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांना प्रसार माध्यमांनी विचारले असता त्यांनी पहिल्यांदा छद्मी हसत म्हणाले की, त्यांच्या ज्ञानाचे मला कौतुक वाटते. लोकशाहीत अशा बैठका घेता येतात की नाही हे महत्वाचे आहे. तसेच त्यांच्याबरोबर चर्चा करता येते की नाही हे ही महत्वाचे आहे. राज्याचे निर्णय हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेच घेतात. त्यामुळे त्या टीकेला फारसे महत्व नाही. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांची तब्येत ठिक नव्हती असेही ते म्हणाले.

मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. तो संप मिटावा यासाठी मंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठकीला उपस्थित राहीलो. आणि यासंदर्भातील सर्व माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांना मंत्र्यांनी पोहोचविली असेल असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

महाराष्ट्रात ज्या पध्दतीने महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्याधर्तीवर गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक राजकिय पक्षाला त्याच्या वाढीसाठी प्रयत्न करण्याचा हक्क आहे. त्या पक्षाला त्यांना मिळालेल्या माहितीनुसार किंवा त्यांच्या अंदाजानुसार काही निर्णय घेतला असेल त्यावर मी भाष्य योग्य होणार नसल्याचेही ते म्हणाले.

देशात धर्मनिरपेक्षतेला लक्ष्य करण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यामुळे त्या विरोधात लढणाऱ्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे. याशिवाय विशिष्ट समाजातील महिलांना लक्ष्य करणे किंवा अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करण्याचे प्रकार थांबविले पाहिजेत असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Check Also

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे गुपित उघड करत पाटील म्हणाले, अन्य नेत्यांकडे पदभार द्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आग्रही मागणी

मराठी ई-बातम्या टीम राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *